बारामतीत काय 370 लागू आहे का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला सवाल


पवारांच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच सभांमध्ये गोंधळ

पुणे – राज्यात कुठलाही पक्ष कुठेही सभा घेऊ शकतो. बारामती काही वेगळे नाही. पवारांच्या पायाखालची वाळू सरकल्याने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सभांमध्ये गोंधळ घालून विरोध करत आहेत, अशी टीका करत बारामतीत काय 370 लागू आहे का? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

महाजनादेश यात्रेनिमित्त रविवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाजनादेश यात्रेत बारामतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून गोंधळ घातला. याबाबत मुख्यमंत्री यांना विचारलेल्या प्रश्‍नावर त्यांनी भाष्य केले. अनेकदा पवारांची सभा आमच्या भागात होते. यावेळी आमचे कार्यकर्ते विरोध करत नाहीत. आम्ही मदतच करतो. मग बारामतीमध्ये इतर पक्षांच्या लोकांनी सभा घ्यायच्या नाही का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

बारामतीमध्ये केवळ 5 ते 7 लोकांनी घोषणाबाजी केली. पोलीस आल्यानंतर त्यांची पळापळ झाली. 7 लोकांवर पोलीस काय लाठीचार्ज करणार, असे म्हणत आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याच्या आरोपाचे फडणवीस यांनी खंडन केले.
राष्ट्रवादीकडून शिवस्वराज्य यात्रेसाठी उद्‌यनराजेंना पुढे करण्याचे काम सुरू होते. मात्र, आता राजे यांनीच भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते टीका करत आहेत. पण जी द्राक्षे मिळत नाही. तेव्हा ती आंबट असतात, अशी टीका त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर केली.

दरम्यान, पोट निवडणुकीत उदयनराजे पुन्हा प्रचंड मताधिक्‍याने विजयी होतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. यापुढे भाजपमध्ये मेगाभरती होणार नाही, मात्र भरती सुरूच राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आता शरद पवार यात्रा काढणार असल्याबाबत विचारले असता, मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या यात्रेला शुभेच्छा असल्याचे सांगितले. सिंचन गैरव्यवहारप्रकरणी उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू असून त्यातील सर्वबाबी प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयासमोर मांडल्या आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

आरे कॉलनी परिसरात प्रस्तावीत कारशेडबाबत आदित्य ठाकरे यांनी घेतलेली भूमिका चांगलीच आहे. आरे संदर्भात असलेल्या अफवा दूर करण्याची गरज आहे. कारशेड बांधत असलेल्या ठिकाणची जमीन वनजमीन नसून, ती सरकारची जमीन आहे. याबाबत अदित्य ठाकरेंशी चर्चा करू, असे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.