पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सासूबरोबर कौटुंबिक वाद झाल्यावर जावयाने सासूच्या दुचाकीसह सोसायटीतील तब्बल १५ दुचाकी जाळल्या. सुदैवाने यात कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. पार्किंग शेजारीच वीजेचे मीटर होते, त्याला झळ बसली असती तर पूर्ण इमारत नेस्तनाबूत झाली असती. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात वाहने जाळणाऱ्या जावयाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना वडगाव बुद्रुक येथील ज्ञानगंगा सोसायटी जवळील महापालिकेच्या इमारतीत मंगळवारी घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एका ज्येष्ठ महिलेचा जावई उत्तमनगर येथे राहतो. तो सध्या काहीही कामधंदा करीत नाही. पत्नीला नेहमी त्रास देऊन भांडणे करतो, त्यांच्या भांडणामध्ये सासूने स्वत:च्या मुलीची बाजू घेऊन जावयाला सुनावले होते. याचा राग जावयाच्या मनात होता. यातूनच जावयाने मंगळवारी रात्री सासूचे घर गाठले.
तेथे तिच्याशी वाद घातला. दोघांची भांडणे झाल्यावर जावई इमारतीच्या पार्किंगमध्ये आला. त्याने सासूच्या स्कुटरला पेट्रोल ओतून पेटवून दिले. यामध्ये सासूच्या स्कुटरसह इतर १४ दुचाकीही जळून खाक झाल्या वाहनांचे सुमारे साडेतीन लाखाचे नुकसान झाले आहे.
यावेळी सोसायटीतील नागरिकांची मोठी धावपळ झाली. त्यांनी या घटनेची खबर अग्निशमन दलाला दिली. अग्निमन दलाचे अधिकारी प्रभाकर उम्राटकर यांनी जवानांच्या मदतीने दोन पाण्याच्या लाइन एकाच वेळी तयार करुन पाण्याचा मारा केला. काही वाहने तातडीने पार्किंगमधून हलवली.
आग विझल्यानंतरही प्रचंड धुर झाला होता, जवानांनी हवा देत स्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत सोसायटीचे ड्रेनेजचे पाइप आणि पाण्याचे पाइप गर्मीने वितळले. यातून पाणी आणि ड्रेनेजच्या समस्येला रहिवाशांना तोंड द्यावे लागत आहे.
दरम्यान, मेट्रोच्या कामामुळे पौड फाटा आणि मंडईतील काही वाड्यांतील नागरिकांना महापालिकेने ही इमारत भाड्याने घेऊन तेथे विस्थापित केले आहे. ही पाच मजली इमारत आहे. इमारतीच्या मागील बाजूला पार्किंग आहे. काहींनी ही घरे भाड्याने दिल्याने तेथे विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात राहतात. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल मालुसरे करत आहेत.
चौकीसमोर पेटवून घेण्याचा जावयाचा प्रयत्न…
पुणे , दि. २ – सासू, सासरे, पत्नीसह पोलीस चौकीत तक्रार देण्यास गेल्याचे समजताच जावयाने चौकीसमोरच पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना चंदननगर येथील महात्मा फुले चौकीसमोर बुधवारी दुपारी घडली. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका विरुध्द चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाद झाल्याने बायको माहेरी निघुन गेली होती.
ती नांदायला परत येत नव्हती. याचा जाब विचारायला जावई सासरी गेला होता. तेव्हा त्याला हे सर्व चौकीत तक्रार देण्यास गेल्याचे समजले. त्याने चौकीत जाऊन स्वत:च्या अंगावर ज्वलनशिल पदार्थ ओतून घेतला. पोलीस आणि इतरांनी त्याला तातडीने वाचवले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पालवे करत आहेत.