गुरूग्राम – हरियाणातील गुरूग्राम मतदार संघात कॉंग्रेसने अभिनेते राज बब्बर ( Raj Babbar) यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचा समर्थक असलेल्या शहरी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कॉंग्रेसने ही खेळी खेळली असली तरी त्यामुळे कॉंग्रेसच्या हरियाणा प्रदेश शाखेत मात्र नाराजीचा सूर उमटला आहे.
७२ वर्षीय राज बब्बर यांना उमेदवारी देण्याची घोषणा कॉंग्रेसने मंगळवारी केली होती. मात्र पक्षातील नेते त्यांना बाहेरचा उमेदवार मानतात. पाच वेळा राज बब्बर खासदार राहीले आहेत. तथापि, त्यांनी त्यांच्या राजकीय जिवनातील बराचसा काळ उत्तर प्रदेशमध्ये काम केले आहे.
गुरूग्राम येथे आता त्यांना भारतीय जनता पार्टीचे नेते राव इंद्रजित सिंह आणि जननायक जनता पार्टीचे उमेदवार तसेच गायक आणि रॅपर राहुल यादव फाजिलपुरिया यांच्याशी मुकाबला करावा लागणार आहे. कॅप्टन अजय सिंह यादव यांनी २०१९ ची निवडणूक कॉंग्रेसकडून लढवली होती. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आताही त्यांना तिकिट मिळण्याची अपेक्षा होती.
ती पूर्ण न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही पार्टीच्या निर्णयाचा आदर करतो. मात्र ज्याने कोणी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे दुर्लक्ष करून तिकिट वाटप केले आहे त्याने हे पक्षासोबत चांगले केले नाही. अगोदर ज्येष्ठ नेते बिरेंद्र सिंह आणि किरण चौधरी यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले. आता माझ्यासोबतही तेच करण्यात आले आहे.
दरम्यान, कॉंग्रेसचे दिग्गज नेते आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्र हुडा यांनी बब्बर यांच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. पक्षाने एक चांगला उमेदवार दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसने हरियाणात लोकसभेच्या १० जागांपैकी ९ जागांवर उमेदवार दिले आहेत. तर कुरक्षेत्र ही दहावी जागा त्यांनी आम आदमी पार्टीसाठी सोडली आहे.