अन्‌ अधिकारी “एचसीएमटीआर’च्या नादात

पुणे – विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या “एचसीएमटीआर’ रस्ता (उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग) पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या महापालिका पथ विभागाला शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा विसर पडला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून बहुतांश रस्त्यावर खड्डे आहेत. मात्र, त्यावेळी पाऊस थांबल्यावर खड्डे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. मात्र, पाऊस थांबून महिना होत आला तरी खड्डेमात्र कायम आहेत. त्याचवेळी सुट्टीच्या दिवशीही महापालिकेत “एचसीएमटीआर’ रस्त्याच्या बैठका सुरू आहेत. त्यामुळे पालिकेला खड्ड्यांऐवजी 12 हजार कोटींच्या खर्चाच्या रस्त्याच्या कामातच जास्त इंटरेस्ट आहे.

महिन्याभरापासून शहर खड्ड्यात
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे शहरातील बहुतांश रस्ते खड्डयात गेले होते. त्यावर पुणेकरांकडून संताप व्यक्‍त करण्यात आल्यानंतर पाऊस जसा उघडीप घेईल, तशी रस्ते दुरुस्ती महापालिकेकडून करण्यात आली. मात्र, त्यानंतर पुन्हा झालेल्या पावसाने खड्डे पडले. त्यानंतर प्रशासनाने पावसाचे कारण देत पूर्ण पाऊस थांबल्यानंतरच रस्ते दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला, मात्र या रस्ते दुरुस्तीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. मात्र, केवळ गणेशोत्सव कालावधीत पथ विभागाने मुख्य विसर्जन मार्गांवर रस्ते दुरुस्ती केली. त्या व्यतिरिक्‍त शहरातील इतर रस्त्यांकडे पाहण्यास वेळच नसल्याचे चित्र आहे.

“एचसीएमटीआर’मध्ये प्रशासनाचा जीव अडकला
शहरातील सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, कर्वेरस्ता, नगररस्ता या रस्त्यांसह इतर प्रमुख रस्ते आणि वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असतानाही पथ विभागासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा जीव “एचसीएमटीआर’मध्ये अडकला आहे. या रस्त्याला कोणत्याही स्थितीत विधानसभेपूर्वी मान्यता मिळविण्यासाठी गेल्या महिन्याभरात सुमारे 50 हून अधिक बैठका पालिकेत झाल्या. मात्र, रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी एकही बैठक घेण्यास आयुक्‍त अथवा पथ विभाग अधिकाऱ्यांना वेळ नाही. त्यामुळे केवळ व्हॉटस ऍपवरच रस्ते दुरुस्तीच्या सूचना दिल्या जात असून त्याचा आढावाही मेसेजद्वारेच घेण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.