पिंपरी, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीत उमेदवारांकडून पैशांचा गैरवापर केला जाण्याची शक्यता आहे. निवडणूक विभागाकडून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे. एका मोटारीतून लाखो रुपयांची रोकड नेली जात असल्याची माहिती भरारी व स्थिर पथकाला बुधवारी (दि. १) सायंकाळी पाचच्या सुमारास मिळाली. त्यानुषंगाने निगडीतील स्थिर सर्वेक्षण पथकाने संशयित वाहनावर कारवाई करुन २९ लाख ५० हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.
निगडी व दापोडी या ठिकाणी (एसएसटी) स्थापित स्थिर सर्वेक्षण पथके कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. निगडीतील पथकाला एका संशयित वाहनात रोकड असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार बुधवारी (दि. १) सांयकाळी पाचच्या सुमारास निगडी येथे (एसएसटी) स्थिर सर्वेक्षण पथकाने वाहन क्रमांक एमएच १२, युव्ही ५००५ (मर्सिडीज बेंझ जीएलएस ४०० डी) या वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यावर या वाहनामध्ये २९ लाख ५० हजार रुपये रोकड मिळून आली.
याबाबत अधिक चौकशी केली असता ही रक्कम दिपक रविंद्र वाणी यांची असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईचे व्हिडीओ चित्रीकरण व जप्ती पंचानामा तयार करण्यात आला आहे. संबंधितास जप्त केलेल्या रक्कमेची पोहोच देण्यात आली आहे. जप्त रक्कम व अनुषंगिक कागदपत्रे उप आयुक्त प्राप्तीकर क्युआरटी मावळ विभाग ३३ मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
ही कार्यवाहीची ईएसएमएस या आयोगाकडील आज्ञावलीमध्ये नोंद करण्यात आलेली आहे. सविस्तर अहवाल पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी मावळ मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती कळविण्यात आली आहे.