पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – इंद्राणी बालन फाउंडेशनच्यावतीने शिखर शिंगणापूर (ता. माण, जि. सातारा) येथील वेद विज्ञान महाविद्यापीठ संचलित श्री ज्ञानमंदिर शाळेला स्कूल बस देण्यात आली. फाउंडेशनचे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते स्कूल बसची चावी संस्थेकडे देण्यात आली. इंद्राणी बालन फाउंडेशन आणि पुनीत बालन ग्रुपचे राज्यभरच नाही तर देशभरात विविध क्षेत्रात मोठे सामाजिक कार्य आहे.
त्यांच्या सामाजिक कार्याचा झेंडा अगदी काश्मीरपर्यंत डौलाने फडकत आहे. यामध्ये शैक्षणिक, अध्यात्मिक, क्रीडा, सामाजिक कार्याचा समावेश आहे. पोलीस विभाग आणि लष्करासोबतही त्यांनी आपल्या सामाजिक दायित्वाचे कर्तव्य निभावले आहे. त्याचाच भाग म्हणून शिखर शिंगणापूर येथेही वेद विज्ञान महाविद्यापीठ संचलीत सुरू असलेल्या श्री ज्ञानमंदिर शाळेसाठी इंद्राणी बालन फाउंडेशनच्या माध्यमातून ४१ आसन क्षमता असलेली स्कूल बस देण्यात आली.
दुष्काळी भाग असलेल्या शिखर शिंगणापूर परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना या स्कूल बसचा उपयोग होईल आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांची प्रगती होण्यास मदत होणार आहे. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे अपेक्स मेंबर राजय शास्तारे, आदित्य जोशी, अमोल येवले आणि महेश सोनी यांच्यासह संस्थेचे विश्वस्त मंडळ उपस्थित होते.
समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हे सर्वांत मोठे साधन आहे. दुष्काळी आणि ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना केवळ प्रवासाच्या सुविधेअभावी या शिक्षणापासून वंचित रहावे लागू नये, या भावनेतून श्री ज्ञानमंदिर शाळेसाठी ही स्कूल बस देण्यात आली. या शैक्षणिक कार्यास हातभार लावता आला, याचे मनापासून समाधान आहे. -पुनीत बालन, अध्यक्ष, इंद्राणी बालन फाउंडेशन