पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल खुले करण्यासाठी नागरी सुरक्षा उड्डाण ब्युरो (बीसीएएस) यांची अद्याप परवानगी मिळालेली नाही. बीसीएसकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर एका आठवड्यात नवीन टर्मिनल सुरू केले जाईल. त्यात ही पहिल्या टप्प्यात दोन विमान कंपन्यांची विमाने नवीन टर्मिनल येथून सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली.
पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. १० मार्चला करण्यात आले होते. उद्घाटन झाले असले तरी प्रत्यक्षात टर्मिनल सुरू होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे दि. १ एप्रिलपासून हे टर्मिनल सुरू करण्याच्या सूचना विमानतळ प्राधिकरणाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या होत्या.
मात्र, विमानतळ प्रशासनाने एप्रिल महिना संपला तरी नवीन टर्मिनल सुरू केले नाही. नवीन टर्मिनल सुरू करण्याची अद्याप ही तारीख निश्चित झालेली नाही. बीसीएएस यांच्याकडून अंतिम मंजुरी आल्यानंतर देखील एक आठवडा नवीन टर्मिनल सुरू होण्यासाठी लागणार आहे. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तरी नवीन टर्मिनल सुरू होणार नाही.
याबाबत ढोके यांनी सांगितले की, नवीन टर्मिनल सुरू करण्यासाठी बीसीएएस यांच्याकडून अंतिम मंजुरी मिळालेली नाही. या मंजुरीसाठी आम्ही वाट पाहत आहोत. नवीन टर्मिनल सुरू करण्यासाठी अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर टप्प्या-टप्प्याने जुन्या टर्मिनल येथील विमान कंपन्या हलविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दोन विमान कंपन्या नवीन टर्मिनल येथे हलविण्यात येतील. त्यांची १८ ते २० उड्डाणे तेथून सुरू केली जाणार आहेत. त्यानंतर इतर कंपन्या तेथे आणण्यात येणा आहेत.