पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – स्वातंत्र्यानंतर मराठी भाषेचे नाही; पण मराठीसाठी कार्य करणारे विद्यापीठ स्थापन व्हावे, अशी अनेकांची इच्छा होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रूपाने ती प्रत्यक्षातही आली. मात्र, कालानुरूप विद्यापीठाची ध्येयधोरणे बदलली आणि मराठीसाठी रचनात्मक कार्य करण्याचे सातत्याने राहून गेले. मात्र, आज विद्यापीठाने मराठीसाठी कार्य करण्याचा अनुशेष मराठी भाषा भवनाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणातून भरून काढला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत विद्यापीठातील मराठी भाषा भवनाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण कुलगुरू डाॅ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास माजी कुलगुरू डाॅ. पंडित विद्यासागर हे प्रमुख पाहूणे होते. या वेळी प्र – कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्वरी मंठाळकर, डॉ. डी. बी.पवार, डाॅ. प्रभाकर देसाई, डाॅ. तुकाराम रोंगटे आदी उपस्थित होते.
सदानंद मोरे म्हणाले, मराठी भाषा भवन हा पुणे विद्यापीठाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्याचे पहिल्या टप्प्यातील लोकार्पण हे तितकेच महत्त्वाचे आणि ऐतिहासिक आहे. टप्प्याटप्प्याने इमारत व प्रकल्प पूर्ण होईल; पण आहे त्या परिस्थितीत मराठीसाठी कार्य करण्याची जबाबदारी सर्वांनी ओळखली आहे. दरम्यान, विद्यापीठातील मराठी भाषा भवनाची निर्मिती ही महाराष्ट्र आणि मराठी भाषेच्या इतिहासातीलच एक महत्त्वाची घटना असल्याचे डॉ. विद्यासागर यांनी सांगितले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात राज्यभाषांना महत्त्व देण्यात आल्याने मराठी भाषा भवनाचे महत्त्व आणखी वाढेल. यूजीसीने स्थानिक भाषांचा प्रसार व प्रचार होण्यासाठी सर्व शाखांमधील बहुतांश विषयातील १५० पुस्तके मराठीत लिहिण्याची जबाबदारी पुणे विद्यापीठाला दिली आहे. सध्या महाराष्ट्र, पंजाब आणि गुजरात ही राज्ये यासंदर्भात आघाडीवर आहेत. यादृष्टीने या मराठी भाषा भवनाला भविष्यात खूप काम करायचे आहे. – प्रा. डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू