निवडणुकीच्या तोंडावर दोन माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल
वडगावशेरी – वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुका अवघ्या आठवड्यावर आलेल्या असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आणखी दोन माजी नगरसेवकांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक सुनील (पप्पू) गोगले आणि किशोर विटकर यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. याचा फायदा विधानसभा निवडणुकीत होणार आहे. या दोन्ही नगरसेवकांसह अजित गंगावणे, राकेश मोहिते, शैलेश घाडगे, संजय शिर्के, प्रवीण कणघरे, अश्विनकुमार गायकवाड, चेतन चव्हाण आणि प्रशांत धिवार यांनी आमदार जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
याबाबत मुळीक म्हणाले, वडगावशेरी मतदार संघामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपची वाढ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या मतदार संघात सर्वाधिक ताकद ही भाजपची आहे. गेल्या दोन महिन्यांत जवळपास सहा ते सात हजार कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच या मतदार संघात 40 हजारांपेक्षा जास्त सभासद नोंदणी झाली आहे. मतदार संघामध्ये भाजपचे 14 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे तीन नगरसेवक आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला बनला असून यावेळीही आपण आमदर म्हणून निवडून येऊ, असा विश्वासही मुळीक यांनी व्यक्त केला.
तसेच 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 400 बुथपैकी 91 बुथवर 40 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान भाजपला झाले आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 440 बुथ पैकी 327 बुथवर भाजपला 50 टक्क्यांपेक्षा मतदान झाले आहे. त्यामुळे भाजपला होणाऱ्या मतदानाचा टक्का वाढतच असून त्याचा आपल्याला फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.