अविस्मरणीय सफर : संडे स्पेशल

अशोक सुतार,
केरी, भुईपाल करत आम्ही वाळपोई शहरात पोहोचलो. उकाडा असल्यामुळे गरम वाटत होते. थोडावेळ थांबून म्हादई जंगलाच्या रस्त्याला लागलो. गोव्याचे एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे येथील शहरांतील बसस्थानके विस्तीर्ण आणि भव्य आहेत. वाळपोई बसस्थानक पाहून मी मित्राला विचारले की, हे सांस्कृतिक भवन आहे की काय? त्यावर त्याने मला ते बसस्थानक असल्याचे सांगितले. रस्त्याने जाताना दुतर्फा अनेक झाडे दिसत होती. आंबा, फणस, काजू ही झाडे अधिक होती. दोन्ही बाजूला भरगच्च हिरवाई दिसू लागली.

सायंकाळ होत आली होती. सूर्यनारायण दिवसभराच्या थकव्याने विश्रांती घेण्याची तयारी करत होता. स्वच्छ हवा, दाट हिरवाई, निळे-जांभळे डोंगर पाहात आम्ही दुचाकीवरून प्रवास करत होतो. मित्राला रस्ता नेहमीचाच असल्यामुळे आमची दुचाकी सर्वात पुढे होती. 20 मिनिटे पुढे गेल्यानंतर डोंगरातील वस्त्या दिसत होत्या. माडाची झाडे, काजूने लगडलेली झाडे पाहात पुढे जात असताना एक अरूंद पूल दिसला. एक नदी वाहत होती. हीच ती म्हादई नदी, जी पुढे अनेकांचे जीवन समृद्ध करत स्थानिक लोकांची जीवनवाहिनी बनली आहे. म्हादई नदी संथपणे प्रवास करत होती. मावळत्या सूर्याचे प्रतिबिंब पडल्यामुळे नदीचे पाणी सोनेरी, केशरी, जांभळे दिसत होते. नदीला नमस्कार करून आम्ही म्हादई जंगलाजवळ पोहोचलो. नंतर चढणीचा घाट सुरू झाला. वस्त्या दिसत होत्या. अखेर म्हादई जंगलाचे प्रवेशद्वार आले.

म्हादई जंगलाजवळील गावात आमचा एक मित्र आम्हाला भेटणार होता. थोड्याच वेळात तो आला. आम्ही वनरक्षकांना भेटून म्हादई जंगल क्षेत्रात प्रवेश केला. जंगलात चार-पाच वस्त्या आहेत. धनगर, कातकरी समाजाचे लोक प्रामुख्याने राहतात. सायंकाळची गडद छाया, विविध प्रकारच्या झाडांनी नटलेले जंगल पाहत आम्ही जंगलातून दुचाकीवरून प्रवास सुरू केला. जंगलात राहायचे म्हणजे अद्‌भुत व आश्‍चर्यकारक गोष्ट आहे. आम्ही जसजसे जंगलात जाऊ लागलो, मोबाइलची रेंज बंद होऊ लागली. जंगलात असताना बाहेरच्या जगाशी संपर्क होऊ शकत नाही, हे विशेष.

मोबाइलशिवाय जगणे हा अनुभव वेगळा, आनंददायक आहे, तसा भीतीदायकही आहे. संध्याकाळच्या वातावरणातील म्हादई जंगल भीतीदायक वाटत होते. या जंगलात गोव्याचा राज्यप्राणी गवा, रेडा, बिबट्या, पट्टेरी वाघ, अस्वल, हरण इ. प्राणी आहेत. सूर्यनारायण क्षितिजापल्याड विश्रांतीसाठी गेला होता. अंधारातील जंगलात प्रवास करणे रोमांचकारी असले तरी अंगाचा थरकाप उडवणारे असते.
(क्रमशः)

Leave A Reply

Your email address will not be published.