पुस्तक परीक्षण : गोष्टी साऱ्याजणींच्या

माधुरी तळवलकर,
“मिळून साऱ्याजणी’ हे एक वेगळी वाट चोखाळणारे मासिक गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ प्रकाशित होत आहे. त्याचा रौप्यमहोत्सव साजरा झाला तेव्हा तोपर्यंतच्या काळात “मिळून साऱ्याजणी’ मासिकात प्रकाशित झालेल्या कथांमधून पंधरा कथांची निवड केली गेली व त्यातून “गोष्टी साऱ्याजणींच्या’ हा कथासंग्रह आकारास आला. मेनका प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात वेगवेगळ्या लेखकांच्या पंधरा निवडक कथा आपल्याला एकत्रित वाचायला मिळतात.

बाईभोवती मौनाचे कडेकोट पहारे असतात. त्या मौनाला छेद देणारे बाईचे बोलणारे डोळे, देहबोली… अंगांगानं ती बोलत असते. मात्र, ते ऐकण्याची संवेदना आपल्याकडे हवी. ही संवेदना जागी करणाऱ्या कथा हे यातील कथांचं वैशिष्ट्य आहे. स्त्री-पुरुष नातं, त्यातले ताण, गुंते, त्या नात्यातलं सत्ताकारण… हे सारं या कथांमधून प्रतीत होतं. स्त्री-पुरुष मैत्रीमधले वेगळे कंगोरे या कथांमधून व्यक्‍त होतात, तशाच त्यातल्या हळुवार जागाही यातील कथांमधे रंगवल्या जातात. कुटुंबप्रमुख म्हणून परंपरागत हक्‍काने मिळालेल्या सत्तेचा अनेक कुटुंबात पुरुष अमाप फायदा घेताना दिसून येतात. त्याचं चित्रण “कैद’ या कथेत आढळतं. पर्यावरण, वृद्धांचे प्रश्‍न, स्त्रीशिक्षण अशा अनेक विषयांना या कथा भिडताना दिसतात.

“बम्पकिन ब्राइड’ ही एका तालुकावजा गावात राहणाऱ्या बुद्धिमान आणि मनस्वी मुलीची कथा आहे. तिला वाचनाची आवड आहे. लेखनाविषयी कुतूहल आहे. नवीन अनुभवांना सामोरं जाण्याची तिच्या अंगी धडाडी आहे. या तिच्या स्वभावाचा एक मतलबी लेखक फायदा घेतो. पण तिच्या जेव्हा हे लक्षात येतं, तेव्हा ती अतिशय शांतपणे एक योजना आखते आणि त्या लेखकाचा निकाल लावते. ही कथा तिच्याच तोंडून नाट्यपूर्ण प्रसंगातून उलगडत जाते. अशीच एक दीर्घकथा एका मुलीच्या तोंडून यात वाचायला मिळते. “तूंब आणि वळण’ या कथेत एका खेडेगावातील मुलगी अनंत अडचणी आणि संकटे यांना पार करत चिकाटीने शिक्षण घेते. परिस्थितीपुढे हरत नाही. पुढेपुढे जात राहते.

स्त्रीचं ऋतुमती होणं हे तिला मिळालेलं निसर्गाचं एक अद्‌भुत देणं! सृजनाचा अनुभव ती यामुळंच घेऊ शकते. मुलं जन्माला येतात. नवा मानव तयार होत राहतो… पिढ्यान्‌पिढ्या. गर्भाशयाचं कार्य संपल्यानंतर कधी पाळी आपोआप जाते. कधी गर्भाशय काढून टाकावं लागतं. हे सगळं संक्रमण आपण नीटपणे समजावून घेतो का? संकोच आणि सामाजिक दडपण यांच्या दबावाखाली स्त्रिया आपसातसुद्धा यावर मोकळेपणाने बोलत नाहीत. बाईच्या या साऱ्या अनुभवाची जाणीव पुरुषांना करून देण्याचा प्रयत्न करणारी सामाजिक कार्यकर्ती असलेली नायिका, तिची गोष्ट ऐकायला जमलेली सारी मंडळी, कार्यकर्ता असलेल्या नवऱ्यालाही न समजलेली तिची व्यथा आणि नव्या पिढीतल्या मुलाला जाणवलेलं त्या वेदनेतलं कारुण्य असा सगळा पट “… आणि थोडी ओली पाने’ या कथेत उलगडत जातो.
ज्या समाजात वर्षानुवर्षे पुरुषांनी आपल्या सुखासाठी स्त्रीला “ठेवलं’, त्या समाजात एका पुरुषाला ठेवताना स्त्रीला होणारं सुख म्हणजे कदाचित या व्यवस्थेवरील सूडच असावा. मात्र, त्यातही स्त्रीसुलभ मार्दव असणारी एक कथा या पुस्तकात आहे.

कथांमधील उत्स्फूर्तता, जीवनाच्या गाभ्याला स्पर्शणारे अनुभव यांमुळे या कथा वाचकांच्या मनाला भिडतील, लक्षात राहतील. या कथासंग्रहाला गीताली वि. मं. आणि नीरजा यांच्या वाचनीय प्रस्तावना आहेत. सचिन जोशी यांनी केलेले पुस्तकाचे मुखपृष्ठ चित्तवेधक झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.