नवे समीकरण : इंजिनाला जोडणार कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे डबे
राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपशी संधान बांधून पुणे महापालिका निवडणुकीत पुणे पॅटर्न आणला होता. मात्र, आता कोथरूड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशीच संधान बांधले असून, मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. यावरून कोथरूडमध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वेगळेच समीकरण पाहायला मिळणार, हे निश्चित झाले आहे.
कोथरूडमधील इच्छुक उमेदवारांना तिकीट न देता भाजपने थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाच तेथे रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे अनेकजण नाराज होते. याशिवाय मनसेच्या उमेदवाराने याआधीही याठिकाणी विधानसभेची निवडणूक लढवली आहे. त्यामुळे आणि मुळात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसला त्या भागात प्रबळ उमेदवारच नसल्याने त्यांची उमेदवाराबाबत चर्चा सुरू होती.
मात्र, भाजपमध्ये अशाप्रकारे अंतर्गत कलह सुरू आहे असे म्हटल्यावर त्यांनी उमेदवार उभा न करता थेट मनसेच्या उमेदवाराला थेट जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
मुंबईमध्ये ठाकरे घराण्यातील आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवत असल्याने, या कुटुंबात निवडणूक लढवणारे ते पहिलेच सदस्य आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनीदेखील त्यांना प्रोत्साहन दिले असून, आदित्य ठाकरेंच्या विरोधात त्यांनी उमेदवारही दिला नाही. त्याच्या उलटी परिस्थिती या कोथरूड विधानसभा मतदारसंघात निर्माण झाली आहे.