तळेगाव स्टेशन, (वार्ताहर) – मावळ तालुक्यात उन्हाचा पारा सतत वाढत आहे. जिवाची लाही होत असून, उन्हाच्या चटक्यापासून बचावासाठी नागरिकांकडून नानाविध प्रकार केले जात आहेत. त्यातीलच एक प्रकार म्हणून पांढरे कॉटन परिधान करण्याकडे त्यांचा कल वाढला आहे. तसेच निवडणूक प्रचारासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांकडून खादी आणि कॉटनच्या सफेद कपड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे अशा कपड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे.
मावळ तालुक्यातील लोणावळा हे थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे. त्यामुळे आसपासच्या परिसरातील वातावरणही राज्याच्या इतर भागापेक्षा थंड असायला हवे होते. मात्र मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड, डोंगरांचे तोडण्यात येणारे लचके, यामुळे मावळ तालुक्यातील तापमानाचा पारा ४० अशांवर गेला आहे. उन्हाचा चांगला तडाखा जाणवत आहे. कामाव्यतिरिक्त नागरिक घराच्या बाहेर पडणे टाळत आहे. मावळमधील बहुतांशी भागातील रस्ते सुने पडले आहे.
इतकेच नाही तर उन्हापासून बचावासाठी त्यांच्याकडून विविध प्रकार अवलंबले जात आहे. पांढऱ्या कपड्यांनी उन्हाचा चटका कमी जाणवत असल्याने पांढरे शर्ट, पॅन्ट, बंडी तर महिलांकडून पांढरे टॉप, कुर्ता, पंजाबी ड्रेस, साडी, लेगीज परिधान करण्याचे प्रमाण वाढले आहे. बाजारात अशाप्रकारचे पांढरे कपडे खरेदीकडे कल वाढला आहे. दुकानांमध्येही पांढरे कपडे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली आहे.
कॉटन (सुती) कपड्यांमुळे गरम होण्याचे प्रमाण कमी होते. उन्हाचा चटका जाणवत नाही. शिवाय त्यांचे वजनही कमी असल्याने उन्हाळ्यात अशा कपड्यांची अधिक मागणी असते. पूर्वी केवळ साधे शर्ट आणि बंडी विक्रीस येत. सध्या बदलत्या युगाप्रमाणे नागरिकांची कपड्यांची बदलती पसंती लक्षात घेता, टी-शर्टपासून ते महिलांसाठी कुर्तीपर्यंत पारंपारिक तसेच वेस्टन पांढरी पोशाखही विक्रीस येत आहे. परिधान केली जाते. उन्हाचा तडाखा अधिक जाणवत असल्याने लुंगीचा वापर वाढला आहे. २५० ते ३०० रुपयांपर्यंत लुंगीची विक्री होत आहे.
सध्या निवडणुकीचा प्रचारही जोमात आहे. राजकीय पक्षांचे नेतेही सफेद रंगाचे कपडे घालतात. सध्या प्रचाराच्या काळात उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणूनही कार्यकर्ते सफेद रंगाचे कपडे परिधान करीत असल्याने या रंगाच्या कपड्यांच्या मागणीत वाढ झाल्याचे दुकानदार सांगत आहेत.
उन्हाळ्यात लुंगीचा वापर होत आला आहे. सुती कपड्याची लुंगी पुरुषांकडून पांढऱ्या कपड्यांना विशेष मागणी होत आहे. महिलांचे पांढरी कुर्ता आणि टॉप अधिक मागणी आहे. तसेच प्लेन पांढऱ्या कपड्यांसह फुलांची डिझाईन असलेले पांढरे कपडेही विक्री होत आहे. यंदा दरांमध्ये दहा टक्के वाढ झाली आहे. – वर्षा गाडेकर, विक्रेता
कपड्यांचे प्रकार दर
शर्ट २०० ते १ हजार
पायजमा २५० ते ४००
लुंगी २५० ते ३००
लहान मुलांची बंडी ५० ते ७०
ज्येष्ठांची बंडी १५० ते २००
लेडीज कुर्ता २०० ते ३००
टॉप ३५० ते १५००
प्लाझो १५० ते २००
लेगीज २०० ते ३५०
पंजाबी ड्रेस ५०० ते २ हजार