मदन भोसले यांचा दारुण पराभव तर आठ उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त
वाई – लक्षवेधी ठरलेल्या वाई विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांनी विजयाची हॅट्ट्रीक मारत भाजपचे उमेदवार माजी आमदार मदन भोसले याचा तब्बल 43,648 एवढ्या मोठ्या मताधिक्याने दारुण पराभव केला आहे. मकरंद पाटील यांना 1,30,486 तर मदन भोसले याना 86,839 मते मिळाली. दरम्यान, निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या अन्य आठ उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले. आमदार मकरंद पाटील यांच्या विजयानंतर वाई, खंडाळा, महाबळेश्वर या तिन्ही तालुक्यात कार्यकर्त्यांनी गुलाल उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषात साजरा केला. दरम्यान, 1358 मतदारांनी मकरंद पाटील तसेच मदन भोसले यांच्यासह इतर आठ जणांनाही नापसंती देत नोटाचा पर्याय निवडला आहे.
गुरुवारी सातारा येथील औद्यागिक वसाहतीत सकाळी 8 वाजता मतमोजनीस प्रारंभ झाला. सुरुवातीला खंडाळा तालुक्याच्या मतमोजणीस सुरुवात करण्यात आली. सकाळी 11 पर्यंत 6 फेऱ्यांची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली होती. पहिल्या फेरिपासूनच मतांची घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राखत मकरंद पाटील यांनी विजयावर शिक्कामोर्तब
केले.
पाटील यांनी पहिल्याच फेरित 1574 मतांची आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीअखेर 3935, तिसऱ्या फेरीअखेर 6389, चौथ्या फेरीअखेर 8785, पाचव्या फेरीअखेर 9710, सहाव्या फेरीअखेर 10,920 सातव्या फेरित मदन भोसले यांनी 817 चे मताधिक्य घेतले, आठव्या फेरिअखेर पाटील यांनी पुन्हा मताधिक्य घेत 11,884 मते मिळवली, नवव्या फेरीअखेर 13,342, दहाव्या फेरीअखेर 15,124, अकराव्या फेरीअखेर 17,189, बाराव्या फेरीअखेर 19,759, तेराव्या फेरीअखेर 21,662, चौदाव्या फेरीअखेर 23,155, पंधराव्या फेरीअखेर 24,855, सोळाव्या फेरीअखेर 24,920, सतराव्या फेरीअखेर 27,581, अठराव्या फेरीअखेर 30,518, एकोणिसाव्या फेरीअखेर 33,036, विसाव्या फेरित मदन भोसले यांनी 700 चे मताधिक्य घेतले. परत मकरंद पाटील यांना एकविसाव्या फेरीअखेर 33600, बाविसाव्या फेरीअखेर 34387, तेविसाव्या फेरीअखेर 35304, चोविसाव्या फेरीअखेर 36,842, पंचविसाव्या फेरीअखेर 38,825, सव्वीसाव्या फेरीअखेर 40,021, सत्ताविसाव्या फेरीअखेर 40,528, अठ्ठाविसाव्या फेरीअखेर 41547, एकोणतिसाव्या फेरीअखेर 42,054, तिसाव्या फेरीअखेर 42,691, एकतिसाव्या फेरीअखेर 43,190, तर बतीसाव्या फेरीअखेर 43,162, व पोस्टलचे 485 असे एकूण 43648 इतके मताधिक्य मिळाले यामध्ये सातव्या, विसाव्या व बतीसावी फेरी वगळता एकही फेरीत भोसले याना मताधिक्य मिळवता आले नाही.
अन्य आठ उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे बसपाचे दीपक काकडे याना 1758 मते, भाकपचे धनराज कांबळे याना 1683 मते, हिंदू महासभेचे ऍड. दत्तात्रय सणस यांना 508 मते, वंचित आघाडी रामदास महानवर याना 3471 मते, महाराष्ट्र क्रांती सेनेचे सचिन चव्हाण यांना 626 मते तर अपक्ष प्रशांत जगताप याना 256 मते, मनोहर कदम यांना 498 मते व श्रीरंग लाखे याना 357 मते मिळाली आहेत. या आठही उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले आहे. सर्वात शेवटी पोस्टल मते मोजण्यात आली.
मदनदादाचे पराभवाचा “चौकार’
माजी आ. मदन भोसले याचा हा सलग तिसरा पराभव आहे. 2009, 2014 आणि आता 2019 अशा सलग तिन विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार मकरंद पाटील यांच्याकडून मदन भोसले यांचा पराभव झालेला आहे. तर यापूर्वी माजी मंत्री कै. मदानराव पिसाळ यांनी 95 मध्ये त्याचा पराभव केला होता. 2004 मध्ये भोसले एकदाच अपक्ष म्हणून निवडून आले होते. दोन निवडणुका ते कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढले तर आताची निवडणूक ते भाजपच्या चिन्हावर लढले. भाजपच्या लाटेत विजयी होऊ असा विश्वास त्यांना व त्याच्या कार्यकर्त्यांना होता. मात्र, सर्वांचा भ्रमनिरास झाला आहे.