गडचिरोली – राज्यातील राजकारणात 2019 पासून अनेक नाटयमय घडामोडी घडत असून दररोज नवनवीन राजकीय समिकरणे समोर येत आहे. आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काही महिन्यांच्या तोंडावर आलेल्या असतानाही या राजकीय उलथापालथी थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. अशातच आता कॉंग्रेसच्या एका मोठ्या नेत्यांने राज्यातील राजकारणावर भाष्य करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री बनविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे म्हणताच राज्यात पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे.
गडचिरोली येथे आयोजित पत्रकारपरिषदेत विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार बोलत होते. यावेळी त्यांनी दावा केला की, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदलून अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा भाजपचा डाव आहे. म्हणूनच शिंदे आजारी असल्याचा बनाव करण्यात येत आहे.
वडेट्टीवार म्हणाले, मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु मुख्यमंत्री कार्यालयाकडून याचे खंडन करण्यात आले होते. आज पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रकृती बरी नसल्याचे सांगण्यात आले आहे. हा सर्व प्रकार भाजपचा डाव असून शिंदेंना आजारी करून अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू आहे.
दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात याच पार्श्वभूमीवर भेट झाली, असा दावाही त्यांनी केला आहे. यावेळी अजित पवार भेटीबाबत शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केल्यास लोकांच्या मनातील संभ्रम दूर होईल, असेही वडेट्टीवार म्हणाले.