PM Narendra Modi On Corruption – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांवर निशाणा साधला. भ्रष्टाचारातून लुटलेला पैसा गरीब जनतेला कशाप्रकारे परत करता येईल यासंदर्भात मी कायदेशीर सल्ला घेत आहे, असे ते म्हणाले. झारखंडमध्ये ईडीने मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली.
एका मंत्र्याशी संबंधित सचिवाच्या नोकराच्या ठिकाणावरून ती हस्तगत करण्यात आली. त्या ताज्या घटनेचा उल्लेख मोदींनी आंध्रप्रदेशातील प्रचार सभेत केला. कामगाराच्या घरालाच भ्रष्टाचाराचे गोडाऊन बनवण्यात आले. झारखंडमधील नेत्यांकडे प्रचंड रक्कम सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. ते पैसे मोजताना मशिनही थकत आहेत.
अशा व्यक्ती कॉंग्रेसच्या प्रथम कुटूंबाच्या निकटवर्तीय का असतात, असा सवाल त्यांनी केला. काळा पैसा पकडल्यावर कॉंग्रेस आणि इंडिया आघाडीचे घटक मला दुषणे देतात. मात्र, मला त्याची पर्वा नाही. मला चिंता गरीब जनतेची आहे. जनतेचा पैसा भ्रष्ट लोक लुटत आहेत, असा आरोप त्यांनी केला. ऐन निवडणूक काळात झारखंडमध्ये रोकड जप्तीची घटना घडली. त्या राज्यात झामुमो-कॉंग्रेस-राजद आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे रोकड जप्तीवरून विरोधकांना लक्ष्य करण्याची संधी भाजपला मिळाली आहे.