मॉस्को – रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी अण्वस्त्रांसह युद्धसराव घेण्याचे आदेश रशियाच्या सैन्य दलाला दिले असल्याची माहीती मिळते आहे. रशियाचे नौदल आणि युक्रेनच्या सीमेजवळील सैन्य या युद्धसरावामध्ये सहभागी होणार आहे, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. या युद्धसरावादरम्यान खबरदारीच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.
या सरावामध्ये धोका नसलेल्या अण्वस्त्रांचा वापर केला जाणार आहे. नॉन-स्ट्रॅटेजिक अण्वस्त्रांना युद्धाच्या परिभाषेत सामरिक अण्वस्त्रे देखील म्हणतात. ही अण्वस्त्रे युद्धभूमीवर वापरण्यासाठी डिझाइन केलेली असतात आणि क्षेपणास्त्रांद्वारे डागली जाऊ शकतात.
युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या आणि रशियाने ताबा घेतलेल्या युक्रेनच्या प्रदेशांचा समावेश असलेल्या दक्षिणी लष्करी जिल्ह्याचे लढाऊ विमाने आणि नौदल, तसेच पायदळाचे सैन्य या युद्धसरावामध्ये भाग घेतील. आगामी काही काळात हा युद्धसराव केला जाईल, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
युक्रेन विरुद्धचे युद्ध सुरू झाल्यापासून पुतीन यांनी अण्वस्त्रांचा धाक दाखवला आहे. या युद्धामध्ये युरोपातील अन्य देशांनी भाग घेतला तर अणुयुद्धाचा धोका असल्याची गर्भित धमकी त्यांनी फेब्रुवारीमध्येच दिली होती. यामुळे रशिया युक्रेनवर अण्वस्त्रांचा वापर करण्याची शक्यता वर्तवण्यात येऊ लागली आहे.