मुंबई – गेल्या चार वर्षांत काश्मीरमध्ये सातत्याने जवानांवर आणि पोलिसांवर निर्घृण हल्ले सुरूच आहेत आणि शेकडो जवानांना त्यात हौतात्म्य पत्करावे लागले. सामान्य जनतेवरही हल्ले झाले. मुख्य म्हणजे शांतता नांदत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात, मग निर्वासित छावण्यांत आजही काश्मिरी पंडित का राहत आहेत? त्या पंडितांची घरवापसी का होऊ शकलेली नाही? या प्रश्नांची उत्तरे मोदी-शहा देऊ शकलेले नाहीत, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे. जम्मू काश्मीरमधून 370 कलम आपण कसे हटवले आणि त्यामुळे जम्मू-काश्मिरात कसे सर्व आलबेल आहे याच्या पिपाण्या ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ही जोडगोळी वाजवत असते. 370 कलम काढल्यामुळे खोऱ्यात शांतता नांदत असून दहशतवादी हल्ले पूर्णपणे थांबल्याच्या गर्जना मोदी-शहा वारंवार करतात. हे दावे पूर्णपणे फोल आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुखपत्रातून करण्यात आली आहे. मोदी-शहांनी काश्मिरातून 370 कलम हटवले ते राजकीय फायद्यासाठी. 370 हटवल्यानंतर ना तेथे पंडित परत आले ना दहशतवादी हल्ले थांबले. काश्मिरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येईल आणि काश्मिरी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. अशी स्वप्ने दाखविण्यात आली. यापैकी काहीच घडलेले नाही. जम्मू- काश्मीरला देशापासून तोडले आहे. आजही तेथील इंटरनेट सेवा, मोबाइल फोन सेवा विस्कळीत करून ठेवली आहे. शैक्षणिक संस्थाही नीट चालवता येत नाहीत आणि परिस्थितीवर सरकारचे नियंत्रण नाही, असा दावा ठाकरे गटाने केला आहे. कलम 370 कलम हटवून पाच वर्षे झाली, पण जम्मू-कश्मीर विधानसभेची निवडणूक घेण्याची हिंमत सरकार दाखवू शकलेले नाही. विधानसभा निवडणूक घेतली तर कश्मिरी जनता मतपेटीतून संताप व्यक्त करेल, या भयातून निवडणूकच न घेण्याचा डरपोकपणा सरकार दाखवत आहे. हे चित्र लोकशाहीसाठी मारक आहे, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.