नवी दिल्ली – भारतीय तटरक्षक दलाने रविवारी केरळच्या किनाऱ्याजवळ, बेपोरच्या पश्चिमेला असलेल्या समुद्री भागातून सहा भारतीय कर्मचाऱ्यांसह एक इराणी मासेमारी बोट ताब्यात घेतली. तटरक्षक दलाच्या बोटी आणि विमानांच्या समन्वयातून करण्यात आलेल्या वेगवान हालचालींमुळे ही कारवाई यशस्वी करण्यात आली.
इराणी बोटीला अडवल्यानंतर, तटरक्षक दलाच्या जवानांच्या तुकडीने बोटीवर प्रवेश केला आणि कसून तपासणी केली. प्राथमिक चौकशीअंती असे दिसून आले की या बोटीचा मालक इराणी नागरिक असून त्याने तामिळनाडूमधील मासेमारांना कंत्राटी स्वरूपाच्या व्यवहारातून बोटीवर काम दिले आणि त्यांना इराण जवळील समुद्रात मासेमारी करण्यासाठी इराणी व्हिसा मिळवून दिले.
बोटीच्या मालकाने त्यांना वाईट वागणूक दिली आणि मुलभूत जीवनावश्यक बाबींपासून त्यांना वंचित ठेवले तसेच त्यांचे पासपोर्ट देखील आपल्या ताब्यात घेतले, असा आरोप या बोटीवरील भारतीय कामगारांनी केला आहे. ताब्यात घेण्यात आलेली बोट अधिक तपासासाठी सोमवारी कोची येथे सुरक्षितपणे आणण्यात आली.