नगर – दिल्लेगेट ते न्यू आर्ट महाविद्यालय स्त्यांवर पडलेले खड्डे आणि वाहतूक कोंडी बाबत वारंवार पाठपुरावा करूनही रस्त्याचे काम अद्यापही झाले नाही. ते तात्काळ सुरु करावे अन्यथा हक्कभंग दाखल करू, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
दिल्लीगेट परिसरातील सिद्धीबागेजवळ पावसामुळे रस्त्यावर मोठ खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहनचालकांना खड्डा किती मोठा आहे याचा अंदाज येत नाही. हे खड्डे वाहनधारकांची त्रेधातिरपीट उडवून देतात. काही बेभान वाहनचालकांमुळे खड्ड्यांतील पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडते.
अशा घटनांमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकी घडून येतात. याबाबत मनपा व बांधकाम विभाग या यंत्रणा एकमेकांकडे बोटे दाखवून वेळ मारून नेतात. या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांचा संताप अनावर होतो. तसेच या रस्त्याबाबत अनेकवेळा बांधकाम विभागाच्या अभियंत्यांसोबत प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी केली व रस्त्याचे काम करण्याच्या सूचना आमदार जगताप यांनी दिल्या आहेत.