सुरूची राड्यातील 60 जणांसह 152 तडीपार

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक कारवाई

सातारा  (प्रतिनिधी) – सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आणि जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीत उद्या, दि. 21 रोजी मतदान होत आहे. या प्रक्रियेला कोणतीही गालबोट लागू नये म्हणून सुरुची राड्यातील 60 आरोपींसह 152 जणांवर तडीपारीचा आदेश जिल्हा प्रशासनाने बजावला आहे. तडीपार केलेल्यांमध्ये साताऱ्यातील आजी-माजी नगसेवकांचा समावेश असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.

याबाबत माहिती अशी, सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक व सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक शांततेत व्हावी, मतदानादिवशी कोणतीही अनुचीत घटना घडू नये याची पुरेपूर खबरदारी प्रशासनाने घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर राजकीय व गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांना शहरातील व्यक्‍तींना तडीपार करण्यात येत आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्यात गाजलेल्या सुरूची राडा प्रकरणातील 60 संशयितांसह 152 जणांना तडीपार करण्यात आले आहे. त्यांना रविवारपासून 24 तास सातारा-जावळी मतदारसंघात येण्यास मनाई करण्यात आली आहे. संबंधितांना शनिवारी रात्रीच मतदारसंघ सोडून जाण्याचे आदेश प्रशासनाने बजावले आहेत. तडीपारीच्या काळात ंसंबंधित हद्दीत आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.