इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये अलिकडच्या काळात झालेल्या हल्ल्यांचा कट अफगाणिस्तानमधून केला गेल्याचा आरोप तालिबानने फेटाळून लावला आहे. मार्च महिन्यात खैबर पख्तुनख्वा प्रांतातल्या बिशाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या एका आत्मघातकी स्फोटात एक वाहन उडवून दिले होते. त्यात या वाहनातील ५ चिनी इंजिनिअर आणि पाक चालक ठार झाले होते. हा हल्ला करणारा अफगाणी होता, असा आरोप पाक लष्कराने केला होता.
त्याला तालिबानने हे उत्तर दिले आहे. अशा हल्ल्यांसाठी अफगाणिस्तानला दोष देणे म्हणजे स्वतःच्या अपयशावरून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे. खैबर पख्तुनख्वामधील चिनीनागरिकांची हत्या होणे, हे पाक सुरक्षा व्यवस्थेचे अपयश आहे, असे तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्ला खवारझमी याने एका निवेदनात म्हटले आहे. चिनी कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यात अफगाणिस्तानचा हात नव्हता, हे चीनलाही कळवण्यात आल्याचे या व्पवक्त्याने सांगितले.
अफगाणी भूमीचा वापर अन्य देशांमधील दहशतवादी कारवायांसाठी केला जाऊ दिला जाणार नाही, असे आश्वासन अफगाण तालिबानने सत्तेत येण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय समुदायाला दिले होते. मात्र ते पाळले नसल्याची टीका पाक लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल अहमद शरीफ यांनी केली होती. त्यालाही तालिबानच्या प्रवक्त्याने उत्तर दिले आहे.
Xi Jinping in France : नवीन शीतयुद्ध थांबवण्यासाठी चीनला मदत करा; जिनपिंग यांचे मॅक्रॉ यांना आवाहन
इस्लामिक स्टेटचे दहशतवादी अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानमधून येत आहेत आणि त्यांचा वापर अफगाणिस्तानविरोधात केला जात असल्याचा पुरावा उपलब्ध आहे. त्याला पाकिस्तानने उत्तर द्यावे, असे खवारझमी याने म्हटले आहे.