वरकुटे मलवडी, (प्रतिनिधी)- वरकुटे मलवडी (ता. माण) परिसरात लोकसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान झाले. दुपारीकडक उन्हाच्या वेळी मतदानाची गती संथ झाली होती. मात्र, नंतर झालेल्या मतदानामुळे येथे सरासरी ५४.४८ टक्के मतदान झाले.
माण तालुक्यातील वरकुटे मलवडीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान बुथ केंद्रे तीन रुममध्ये विभागण्यात आली होती. प्रत्येक बुथ केंद्रावर सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महिला व पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगा होत्या.
मतदान शांततेत पार पाडण्यात आले. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मतदारांनी सकाळच्या सत्रात जास्त मतदानाचा अधिकार बजावला. वरकुटे मलवडीचा उष्णतेचा पारा 41 अंश सेल्सियस असल्याने दुपारच्या सत्रात मतदार कमी प्रमाणात मतदान केंद्राकडे येत होते.
दुपारच्यापुढे मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. येथील एकूण मतदान 4168 इतके असून त्यापैकी 2271 मतदारांनी मतदान केले. सरासरी 54.48 टक्के मतदान झाले.