IPL 2024 (SRH vs LSG Match 57, Score Update) : आज IPL 2024 च्या 57 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादसमोर 166 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लखनौने 20 षटकांत चार गडी गमावून 165 धावा केल्या आहेत.
एकवेळ लखनौने 12 व्या षटकात 66 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. यानंतर आयुष बडोनी आणि निकोलस पुरन यांनी 52 चेंडूत 99 धावांची नाबाद भागीदारी केली. त्यामुळे लखनौला 165 धावसंख्येपर्यंत मजल मारण्यात यश आले. बडोनीने 30 चेंडूंत नऊ चौकारांच्या मदतीने नाबाद 55 धावा केल्या. त्याचवेळी पुरणने 26 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 48 धावांची नाबाद खेळी केली.
पूरन आणि बडोनी यांनी विशेषत: शेवटच्या 5 षटकांमध्ये हैदराबादच्या गोलंदाजांची धुव्वा उडवली. पूरन आणि बडोनी यांनी शेवटच्या 5 षटकात 63 धावा केल्या आणि 99 धावांची भागीदारी करून लखनौला कमी धावसंख्येपर्यंत जाण्यापासून वाचवले. याव्यतिरिक्त लखनौकडून फलंदाजीत केएल राहुलने 33 चेंडूत 29 तर कृणाल पांड्याने 21 चेंडूत 24 धावांची खेळी केली. क्विटंन डी-काॅक केवळ 2 धावा काढून माघारी परतला.
हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने 4 षटकात 12 धावांत 2 बळी घेतले तर पॅट कमिन्सने 4 षटकात 47 धावा देत 1 बळी घेतला. टी नटराजन सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकात एकही विकेट न घेता 50 धावा दिल्या.