सातारा, (प्रतिनिधी)- धमकी देऊन खंडणी मागितल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ‘तहसीलदारांकडे तक्रार अर्ज करुन तुझे हॉटेल सील करेन,’ अशी धमकी देऊन तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, भीतीपोटी रोख 10 हजार रुपये दिले असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
रोहन अरुण राजेशिर्के, संदीप शिंदे, मोरे (पूर्ण नाव, वय, पत्ते माहित नाहीत) यांच्याविरुध्द सचिन महादेव कासुर्डे (वय 43, रा. शाहूनगर, सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 2 मे रोजी घडली आहे. तक्रारदार सचिन कासुर्डे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचे आरटीओ चौक परिसरात हॉटेल आहे.
संशयित तिघांनी आपआपसात संगनमत करुन खंडणीची मागणी केली. तहसीलदारांकडे तुझ्या हॉटेलची तक्रार कडून सील करेन. तक्रार नको असेल तर तीन लाख रुपये द्यायचे,’ असे म्हणून धमकी दिली. यामुळे कासुर्डे यांनी भीतीपोटी 10 हजार रुपये रक्कम त्यांना दिली. उर्वरीत रक्कम देण्यासाठी गोळी घालून मारण्याची धमकीही दिली. यामुळे त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची चोरी
शाहूपुरीत अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन घरातून 1 लाख 52 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज चोरुन नेला.
पल्लवी तुकाराम यादव (वय 32, रा. शाहूपुरी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 10 मार्च ते 6 मे या कालावधीत घडली आहे. चोरट्यांनी घरातून सोन्याची चेन, मिनी गंठण, सोन्याचे टॉप्स, मंगळसूत्र, सोन्याची अंगठी असा ऐवज चोरुन नेला.
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा
पतीने पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनुराधा शैलेश शेटे (वय 49) यांनी शैलेश प्रभाकर शेटे (रा. शनिवार पेठ, सातारा) यांच्याविरुध्द तक्रार दिली आहे. सदरबझार येथील लॅबमध्ये दि. 6 मे रोजी ही घटना घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पतीने स्टीलच्या रॉडने मारहाण केली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.