पिंपरी – पिंपरी चिंचवड शहराची वाटचाल ही मेडीकल हब म्हणून होत असतानाच शहरातील कुष्ठरोगींची वाढती संख्या चिंताजनक आहे. महापालिका आणि राज्य शासनाच्या वतीने कुष्ठरोग निर्मूलनासाठी उपचार पद्धती राबविण्यात येत आहेत. या रोगावर उपचार सुरू असलेल्यांची संख्या मागील वर्षभरात 121 इतकी असून पेन्शन घेणाऱ्यांची संख्या 225 इतकी आहे. 2020 मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही 66 होती. यातून रुग्णसंख्या वाढताना दिसत असून या रोगाचा समूळ उच्चाटनासाठी प्रयत्नांची गरज आहे.
पिंपरी चिंचवड शहराची ओळख कामगारनगरी, औद्योगिकनगरी पुसून ती स्मार्ट सिटी, मेट्रोसिटी आणि आता मेडिकल हबकडे वाटचाल सुरू आहे. शहरात महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळत असल्याने शहराबाहेरील रुग्णही उपचारासाठी येतात. मात्र, शहरात आजही फुगेवाडी येथे रेल्वे स्टेशननजीक अनेक वर्षांपासून “आनंदवन कुष्ठ वसाहत’ आहे. पाचशे- हजारभर लोकांची ही वस्ती आहे. नवीन औषधांमुळे कुष्ठरोगाचे निमूर्लन होत आहे. मात्र, या लोकांना कुष्ठरोग झाला त्यावेळी उपचार नव्हता. या रोगाची लक्षणे दिसू लागल्यामुळे आप्तेष्ट, तसेच समाजाने त्यांच्याकडे पाठ फिरविली. समाजाने नाकारलेली मंडळी या वस्तीत आसऱ्याला आली. रोगाची लक्षणे वाढत गेल्यानंतर हाताची बोटे झडून गेल्यामुळे त्यांना काम करता येणे शक्य नव्हते. त्यांच्यासाठी पिठाची गिरणी, मिरची कांडप, बचतगटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच कुष्ठरुग्णांची मुले सुदृढ आणि कोणतीही व्यंग नसलेली आहेत. तरी, आजही या आजारामुळे महापालिकेकडून पेन्शन घेणाऱ्यांची संख्या सुमारे 225 आहे.
खास कुष्ठरोगींसाठी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात वेगळा विभाग आहे. तेथे पिंपरी चिंचवड महापालिकेचे कर्मचारी आणि शासनाचे कर्मचारी कार्यरत आहेत. सर्व औषधे त्यांना पुरविली जातात. शासनाच्या नियमानुसार महापालिकाही कुष्ठरोग निर्मूलनासाठी प्रयत्न करत आहे.
– वर्षा डांगे, महिला वैद्यकीय अधिकार
आरोग्य सुविधांवर भर
जिजाऊ क्लिनिक, आपला दवाखाना यांच्या माध्यमातून रुग्णांना वैद्यकीय सुविधा महापालिका देते. त्यातून परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य विषयक सुविधा, रुग्णांची तपासणी व आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याने महापालिकेच्या इतर दवाखान्यांवरील ताण कमी होतो. वेळीच निदान उपचार होत असल्याने पुढील समस्या टाळता येतात. शासनामार्फत आरोग्याच्या सेवा पुरविण्यासाठी ही रुग्णालये काम करतात.