Sanju Rathod | Gulabi Sadi Song | New York Times Square : सिनेसृष्टीत आपल्या जिद्दीच्या जोरावर स्थान निर्माण करणारा गायक संजू राठोड त्याच्या नवनवीन गाण्यांमुळे अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे. त्याच्या गाण्यांनी सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.
त्याचं ‘गुलाबी साडी..’ हे गाणं सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाल असून, सध्या सगळीकडे फक्त याच गाण्याची चर्चा चालू आहे. फेसबुक, युट्युब आणि इंस्टाग्रामवर हेच गाणं ऐकायला-पाहायला मिळतंय.
दरम्यान, आनंदाची बाब म्हणजे ‘गुलाबी साडी’ हे मराठी गाणं ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर झळकलं आहे. ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर झळकणा-या पहिल्या मराठी गाण्याचा मान संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ला मिळाला आहे.
‘गुलाबी साडी’ या गाण्याला ‘यूट्यूब’वर 70 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर ‘स्पॉटीफाय’वरही या गाण्याने 15 दशलक्षांचा टप्पा पार केला आहे.
तसंच ‘युट्यूब’वरील जागतिक स्तरावरच्या उच्चांक गाठणाऱ्या व्हिडीओंमध्ये आणि ‘स्पॉटीफाय’च्या जागतिक व्हायरल गाण्यांमध्ये ‘गुलाबी साडी’ गाण्याचा समावेश करण्यात आला आहे.
संजू राठोड काय म्हणतो पाहा….
गायक म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करताना हे इतकं यश मिळेल याचा कधी विचारही केला नव्हता. अल्पावधीतच एवढं यश मिळालं यासाठी मी स्वत:ला फार भाग्यवान समजतो. आतापर्यंत माझ्या गाण्यांनी मिलियन व्ह्यूज चा टप्पा पार केला हाच आनंद माझ्यासाठी फार मोठा होता.
त्यात आता न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर माझं गाणं झळकलं. यामुळे माझ्या आनंदात आणखी भर पडली आहे. माझा आनंद मला शब्दांत व्यक्त करता येत नाही आहे. हे सगळं शक्य झालं ते माझ्या चाहत्यांमुळे. असं तो म्हणाला आहे.