पुणे : विशेष मुलीवर त्याने बलात्कार केला. या प्रकरणात पीडित मुलीने खाणाखुणा, हातवारे करून आरोपीने बलात्कार केल्याची दिलेली साक्ष न्यायालयात महत्वाची ठरली. न्यायालयाने आरोपीला दोषी धरत दहा वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.पी रागीट यांनी हा निकाल दिला. प्रताप बबनराव भोसुरे (वय ५९ रा. धानोरे ता. शिरूर जि. पुणे) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
या प्रकरणी मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. ही घटना १८ मे २०१५ मध्ये घडली. पीडित मुलगी सकाळी ८ वाजता शेळ्या चारण्यासाठी रानात गेली होती.
आरोपीने शेतातील पडीक जागेतील मंदिराजवळ पीडितेला गोळ्या खायला देतो म्हणून जवळ बोलावले आणि तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यामुळे पीडिता गर्भवती राहिली असल्याचे पीडितेच्या आईने फिर्यादीत नमूद केले आहे.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. त्यांनी ९ साक्षीदार तपासले. पीडित मुलगी मानसिकदृष्ट्या असक्षम असल्याने तिला इन कॅमेरा काही प्रश्न विचारण्यात आले.
पीडित मुलीने खाणाखुणा आणि हातवारे करून तिच्यावर आरोपीने केलेल्या जबरदस्तीची कहाणी सांगितली. न्यायालयात पीडित मुलीची साक्ष महत्वाची ठरली. शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमचंद्र बी खोपडे यांनी तपास केला.
कोर्ट पैरवी कर्मचारी पोलीस हवालदार एस.बी भागवत आणि पोलीस कॉन्स्टेबल म्हणून ज्ञानदेव सोनावणे तसेच कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक विद्याधर निचीत यांनी काम पाहिले.