Priyanka Gandhi on PM । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये केलेल्या मंगळसूत्राच्या टीकेवरुन काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आता चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी पंतप्रधानांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलंय. प्रियांका गांधी यांनी त्यांची आई सोनिया गांधी आणि आजी इंदिरा गांधी यांचं उदाहरण दिले आहे.
“माझ्या आईचं मंगळसूत्र देशासाठी शहीद झालंय Priyanka Gandhi on PM ।
“पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की काँग्रेस पक्ष विभाजन धार्जिणा आहे. साठ वर्षांत फक्त त्यांनी त्यांची तिजोरी भरली बाकी काही केलं नाही. मात्र मी त्यांना सांगू इच्छिते माझ्या आईचं मंगळसूत्र (राजीव गांधी) देशासाठी शहीद झालं. काँग्रेस पक्ष तुमच्या गळ्यात मंगळसूत्र ठेवणार नाही असं मोदी म्हणतात. ७० वर्षांपासून देश स्वतंत्र आहे. त्यातल्या ५५ ते साठ वर्षांमध्ये काँग्रेसची सत्ता होती. कधी कुठल्या स्त्रीचं मंगळसूत्र हिसकावून घेतल्याचं उदाहरण आहे का?” असा सवाल प्रियांका गांधींनी केला.
प्रियांका गांधी पुढे म्हणाल्या, “इंदिरा गांधींनी युद्ध झालं तेव्हा त्यांचं सोनं या देशाला दिलं. माझ्या आईचं मंगळसूत्र (राजीव गांधी) या देशासाठी शहीद झालं आहे. वास्तव हे आहे की महिलांचा संघर्ष काय? हे यांना ठाऊक नाही. महिलांचा सेवाभाव हा देशाचा आधार आहे.” असंही प्रियांका गांधी म्हणाल्या.
मोदींना मंगळसूत्राचं महत्त्व कळलं असतं तर ते कधीही अशा अनैतिक गोष्टी बोलले नसते. शेतकऱ्याला कर्ज झालं की त्याची पत्नी दागिने गहाण ठेवते. घरात लग्नकार्य असेल तर महिला त्यांचं सोनं गहाण ठेवतात. मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेतल्याने अनेक महिलांची बचत संपली तेव्हा मोदी कुठे होते? असे प्रश्नही प्रियांका गांधींनी विचारले आहेत.
महिलांना घाबवरलं जातंय Priyanka Gandhi on PM ।
बंगळुरुतल्या सभेत बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या, महिलांना घाबरवलं जातं आहे. मंगळसूत्राचा आरोप करुन त्यांना मतदान केल्याचं आवाहन केलं जातं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या देशातल्या नेत्याने नैतिकता सोडून दिली आहे. दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात डांबलं आहे. विरोधकांना कमकुवत करण्यासाठीच हे केलं जातं आहे. मागच्या दहा वर्षांत या सरकारने काहीही काम केलेलं नाही. मणिपूरच्या भगिनींचे अश्रू पुसण्यासाठी मोदी का गेले नाहीत? असाही सवाल प्रियांका गांधींनी केला आहे.