Pune Market yard – लोकसभा निवडणूक मतदान करण्यासाठी राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. मंगळवारी (दि.७) राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान आहे. यामध्ये जिल्ह्यातील बारामती मतदार संघाचा समावेश आहे. या अनुषंगाने बाजार समितीचे जे कर्मचारी-अधिकारी यांचे मतदान बारामती मतदार संघात आहे. त्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे शेतकऱ्याच्या शेतमालाचे नुकसान होऊ नये, यासाठी मार्केट यार्डातील बाजार आवार सुरू राहणार आहे.
शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या मालाची नियमित विक्री होईल, असे परिपत्रक पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी सभापती दिलीप काळभोर यांच्या मान्यतेने काढले आहे. याबाबतची प्रत बाजार आवारातील सर्व संघटनांना पाठविण्यात आली आहे. तरी मंगळवारी शेतकरी माल विक्रीसाठी आणू शकतात, याची नोंद घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.