Terror threat in T20 World Cup 2024 : टी20 विश्वचषक 2024 स्पर्धा ही 1 जूनपासून सुरू होणार आहे. यावेळचा विश्वचषक अमेरिका आणि कॅरेबियन देशांमध्ये संयुक्तरित्या होणार आहे. मात्र स्पर्धा सुरू होण्यापूर्वी वेस्ट इंडिज म्हणजेच कॅरेबियन देशांना दहशतवादी हल्ल्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. ही धमकी उत्तर पाकिस्तानातून आली आहे. मात्र, क्रिकेट वेस्ट इंडिजने याबाबत सुरक्षा व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे.
T20 विश्वचषकादरम्यान कॅरेबियन देशांना लक्ष्य करण्याची धमकी उत्तर पाकिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या आईएस-खोरासान (IS-Khorasan) कडून मिळाली आहे. दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने 2024 टी-20 वर्ल्ड कपसह जगभरातील मोठ्या कार्यक्रमांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. कॅरेबियन मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, आयएसच्या मीडिया ग्रुप ‘नाशीर पाकिस्तान’कडून गुप्तचर माहिती मिळाली आहे. त्रिनिदाद एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, ‘नाशीर पाकिस्तान’ हे आयएसशी जोडलेले एक प्रोपगंडा चॅनल आहे.
‘क्रिकबझ’च्या वृत्तानुसार, यानंतर जारी करण्यात आलेल्या सुरक्षा अलर्टमध्ये म्हटले आहे की, “प्रो-इस्लामिक स्टेट (IS) मीडिया स्रोतांनी क्रीडा स्पर्धांविरुद्ध हिंसाचार भडकावण्याची मोहीम सुरू केली आहे, ज्यामध्ये अफगाणिस्तान-पाकिस्तान शाखेच्या एका व्हिडिओ संदेशासह अनेक देशांमध्ये झालेल्या हल्ल्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे आणि समर्थकांना त्यांच्या देशांमध्ये परत जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशाच्या युध्दाच्या रणांगणात सामील होण्याची विनंती केली आहे.”
या गंभीर प्रकरणाबाबत क्रिकेट वेस्ट इंडिजचे सीईओ जॉनी ग्रेव्हज यांनी क्रिकबझशी बोलताना सांगितले की, “आम्ही यजमान देश आणि शहरांमधील अधिकार्यांसह जवळून काम करतो आणि आमच्या कार्यक्रमासाठी ओळखल्या जाणाऱ्या कोणत्याही जोखीम कमी करण्यासाठी आवश्यक योजना तयार केल्या आहेत याची खात्री करण्यासाठी आम्ही जागतिक लँडस्केपचे सतत निरीक्षण आणि मूल्यांकन करतो.”
टी20 विश्वचषक प्रथमच 20 संघांसह खेळवला जाणार …
दरम्यान, T20 विश्वचषकाच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल जेव्हा 20 संघांसह ही स्पर्धा खेळवली जाईल. क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा T20 विश्वचषक असेल, ज्यासाठी सुरक्षा व्यवस्था मजबूत असणे आवश्यक आहे.