Jet Airways news: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अंतरिम जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गोयल यांना वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती एन.जे. जमादार यांच्या खंडपीठाने सांगितले की, गोयल यांना एक लाख रुपयांची जामीन भरावी लागेल आणि विशेष न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय ते मुंबई सोडू शकणार नाहीत. गोयल यांना त्यांचा पासपोर्ट देखील जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
ईडीने विरोध केला होता –
नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता गोयल हे कर्करोगाने ग्रस्त आहेत. यापूर्वी, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नरेश गोयल यांच्या अंतरिम जामीन अर्जाला विरोध केला होता. ईडीने सांगितले होते की, त्यांचा खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा कालावधी एक महिन्याने वाढवला जाऊ शकतो. गोयल यांनी आरोग्य्याच्या कारणास्तव अंतरिम जामीन मागितला होता.
विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला होता –
गेल्या फेब्रुवारीमध्ये विशेष न्यायालयाने नरेश गोयल यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. मात्र, न्यायालयाने त्यांना त्यांच्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याची परवानगी दिली होती. यानंतर गोयल यांनी एप्रिलमध्ये अंतरिम जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
गेल्या वर्षी झाली होती अटक –
दरम्यान, ईडीने सप्टेंबर 2023 मध्ये गोयल यांना मनी लाँड्रिंग आणि जेट एअरवेजला कॅनरा बँकेने कर्ज म्हणून दिलेल्या 538.62 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या आरोपाखाली अटक केली होती. या प्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर गोयल यांची पत्नी अनिता गोयल यांना नोव्हेंबर 2023 मध्ये अटक करण्यात आली होती. अनिता यांना अटकेच्या दिवशी त्यांच्या वयाच्या आणि वैद्यकीय स्थितीच्या आधारावर विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला होता परंतु विशेष न्यायालयाने नरेश गोयल यांना त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात उपचार दिले जात असल्याच्या कारणावरुन जामीन नाकारला होता.