श्रीगोंदा – श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता माजी आमदार राहुल जगताप यांनी काबीज केला असून सभापतीपदी प्रविण उर्फ अतुल लोखंडे यांची तर उपसभापतीपदी मनीषा योगेश मगर हे जगताप गटाचे दोन्ही उमेदवार अठरापैकी दहा मते मिळवून विजयी झाले. विरोधी गटाच्या उमेदवारांना प्रत्येकी आठ मते मिळाली.
येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अभिमान थोरात यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या पदाधिकारी निवडी काल झाल्या. या बैठकीला सर्व अठरा संचालक उपस्थित होते. यामध्ये सभापती व उपसभापती पदासाठी जगताप गटातर्फे अनुक्रमे अतुल लोखंडे आणि मनीषा मगर यांचे तर आ. पाचपुते-नागवडे गटातर्फे प्रशांत ओगले आणि लक्ष्मण नलगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
सभापतीपदासाठी झालेल्या मतदानात लोखंडे यांना दहा तर ओगले यांना आठ मते मिळाल्याने लोखंडे दोन मतांनी विजयी झाले. तर उपसभापती पदासाठी झालेल्या मतदानात मगर यांना दहा तर नलगे यांना आठ मिळाल्याने मनीषा मगर दोन मतांनी विजयी झाल्या. बाजार समितीत जगताप गटाचे बहुमत असल्याने बाळासाहेब नाहाटा हे साजन पाचपुते यांना सभापतीपद देण्यासाठी आग्रही होते. मात्र माजी आमदार राहुल जगताप यांनी अतुल लोखंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करीत त्यांना सभापती केले.
तर विरोधी गटाकडून सभापतीपदासाठी लक्ष्मण नलगे आणि उपसभापती पदासाठी प्रशांत ओगले यांचे उमेदवारी अर्ज भरले जाणार होते, ऐनवेळी अदलाबदल करण्यात आली. मात्र तरीही त्यांना चमत्कार घडविण्यात यश आले नाही. दरम्यान, सभागृहातील मतदान प्रक्रियेचे चित्रिकरण करण्यासाठी खिडकीत एक मोबाईल जाणीवपूर्वक ठेवल्याची हरकत मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी एका संचालकांनी घेतली. यानंतर काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. अखेर त्या मोबाईलसह सगळ्यांचेच मोबाईल बाहेर ठेवण्यात आले.
जगतापांचे एक मत फुटले
पदाधिकारी निवडीत दोन्ही गटांकडून एकमेकांचे संचालक गळाला लावल्याचे दावे खासगीत केले जात होते. प्रत्यक्ष निवडीत मात्र जगताप गटाचे एक मत फुटले. ते मत सभापती पदाच्या नाराजीतून फूटल्याची चर्चा आहे. ते फुटलेले मत कोणाचे याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.