Lok Sabha Election 2024 । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सायंकाळी लष्कर भागातील रेसकोर्स मैदानावर सभा होणार आहे. रेसकोर्स येथे पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाविजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला महायुतीचे जवळपास दोन लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी शक्यता भाजप नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
अशात एक बॅनर चर्चेत आले आहे. या बॅनरवर आयुष दीपक कांबळे असे नाव लिहिण्यात आले आहे. त्यासोबत , एक सुशिक्षित बेरोजगार पुणेकर, निर्यात बंदी असो महागाई असो, बेरोजगार असो, इथल्या प्रत्येक शेतकर्याचा, मायमाऊलीचा, युवकांचा आक्रोश तुम्हाला तडीपार केल्याशिवाय गप्प राहणार नाही. जाती, धर्म, मंदिर, मशिद यावर बोलण्यापेक्षा विकासावर, बेरोजगारीवर बोला, अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे. हे फ्लेक्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.
याबाबत आयुष दीपक कांबळेने माध्यमांशी बोलतांना सांगितले, ‘मी वानवडी भागात राहण्यास असून मी पदवीधर आहे. मी अनेक ठिकाणी काम मिळावे, यासाठी अर्ज केले. मात्र काही काम लागले नाही. त्यामुळे मी टेम्पो चालविण्यास सुरुवात केली आहे. पण एवढं शिक्षण घेऊन देखील आपल्याला काम मिळत नसेल तर काय करायचे, तसेच मागील दहा वर्षात देशातील कोणत्याही वर्गासाठी काम केले नाही. केवळ उद्योगपती करताच त्यांनी काम केले आहे. त्यामुळे फ्लेक्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात रोष व्यक्त केल्याचे त्याने सांगितले.
हे वाचले का ? ‘काँग्रेसचा मेंदू फुटलाय…’ पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल