Lok Sabha Election 2024: पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि अकाली दलाची जोरदार तयारी सुरू आहे. या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांव्यतिरिक्त खलिस्तान समर्थकही अनेक लोकसभा जागांवर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यामध्ये असे अनेक आहेत जे उघडपणे खलिस्तानची मागणी करतात आणि त्या विचारसरणीचे समर्थनही करतात. त्यापैकी एक अमृतपाल सिंग. जे गेल्या अनेक महिन्यांपासून आसामच्या दिब्रुगड येथील तुरुंगात बंद आहे. अमृतपाल सिंग यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, ते अपक्ष उमेदवार म्हणून खडूर साहिब मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
अमृतपाल सिंग यांच्याशिवाय संगरूरचे लोकसभा खासदार सिमरनजीत सिंग मान हेही पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. पोटनिवडणूक जिंकून ते खासदार झाले आणि पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. खासदार झाल्यानंतरही सिमरनजीत सिंह यांनी उघडपणे फुटीरतावादी विचार व्यक्त केले होते आणि खलिस्तान हे सत्य आहे, जे कोणीही नाकारू शकत नाही, असे म्हटले होते. सिमरनजीत सिंग यांनी असेही म्हटले होते की, जसे भारत आणि पाकिस्तान आहेत, तसेच खलिस्तानही आहे. सिमरनजीत सिंग मान यांच्या या खुलाशावर बराच वाद निर्माण झाला होता. त्यांनी खलिस्तान समर्थकांना परदेशात पाठवण्यात मदत केल्याची कबुली दिली होती आणि त्यांना आश्रय देण्यासाठी पत्रही लिहिलं होतं.
सिमरनजीत सिंग यांच्याशिवाय इंदिरा गांधींचे मारेकरी बेअंत सिंग यांचा मुलगा सरबजीत सिंग खालसा यांनीही निवडणूक लढवत आहेत. 45 वर्षीय सरबजीत सिंग खालसा यांनी 12वीतच शिक्षण सोडले होते. त्यांनी यापूर्वी 2014 आणि 2019 मध्ये निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही. यावेळी ते फरीदकोट (राखीव) जागेवरून निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी त्यांनी फतेहगढ साहिब आणि भटिंडा येथून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता. सरबजीत सिंग यांचे आजोबा सुचा सिंग आणि आई बिमल कौर हे देखील खासदार राहिले आहेत.
सरबजीत खालसा हा इंदिरा गांधींच्या खुन्याचा मुलगा –
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे दोन सुरक्षा कर्मचारी बेअंत सिंग आणि सतवंत सिंग यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्याच घरी ही हत्या करण्यात आली होती. सरबजीत सिंग खालसा याने अनेकदा उघडपणे खलिस्तानचे समर्थन केले आहे. सध्या काँग्रेसचे मोहम्मद सादिक फरीदकोटमधून खासदार आहेत. काँग्रेसने त्यांना आणखी एक संधी दिली आहे. या लोकांशिवाय संदीप सिंह यांनीही निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. हे संदीप सिंग देखील अमृतपाल सिंगचा समर्थक आहे.
कोण आहे सुधीर सुरीचा मारेकरी संदीप सिंग, तुरुंगातून निवडणूक लढवणार ?
संदीप सिंग यांच्यावर 2022 मध्ये हिंदू नेते सुधीर सुरी यांची हत्या केल्याचा आरोप आहे. नुकतीच संदीपच्या कुटुंबीयांची आणि शीख संघटनांची बैठक झाली, त्यानंतर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू करण्यात आल्याचे वृत्त आहे. संदीप आझाद अमृतसर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांची निवडणूक प्रक्रिया तुरुंगातून पूर्ण होणार आहे. अमृतपाल डिब्रूगड तुरुंगातून निवडणूक लढवू शकतो, तर संदीपही निवडणूक लढवेल, असे संदीपच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. संदीप सिंग उर्फ सनी हा खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगचा निकटवर्तीय आहे.