भंडारा – तुमसर येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील (Subhash Chandra Bose Government Hospital) डाॅक्टरांच्या निष्काळजीपणामुळे प्रसूतीनंतर महिलेला मोठा त्रास सहन करावा लागला आहे. प्रसूतीनंतर रक्तस्त्राव होत असल्यामुळे योनी मार्गात कापड ठेवण्याते आले होते. मात्र ते पुन्हा काढण्यास डाॅक्टर विसरले. योनी मार्गात त्रास होऊ लागल्याने डाॅक्टरांचा हा निष्काळजीपणा दोन दिवसांनी उघडकीस आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तुमसर तालुक्यातील तामसवाडी गावातील महिलेची येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात 24 एप्रिल रोजी प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. 25 एप्रिलला नाॅर्मल प्रसूती झाली. प्रसूतीदरम्यान महिलेला रक्तस्त्राव होऊ लागल्याने तो थांबविण्यासाठी डाॅक्टरांनी योनीमार्गात कापड ठेवले. मात्र उपचारानंतर ते काढण्याचा विसर पडला.
योनी मार्गात राहिलेल्या कापडामुळे काही दिवसांनी महिलेला पोटदुखीचा त्रास सुरु झाला. तसेच उग्र वास येत होता. त्यानंतर कुटुंबियांनी खासगी रुग्णालयात दाखल केले असता योनी मार्गात कापड असल्याचे तपासणीदरम्यान निदर्शनास आले. डाॅक्टरांनी उपचार करुन कापड बाहेर काढल्यानंतर आता महिलेची प्रकृती ठीक आहे. मात्र शासकीय रुग्णालयातील डाॅक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.