जामखेड – लक्षवेधी ठरत असलेल्या कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार ना. राम शिंदे यांनी आपली खास यंत्रणा मैदानात उतरवली आहे. त्यामुळे निवडणुकीला चांगलीच रंगत आली असून, संपूर्ण मतदारसंघ भाजपमय करण्यासाठी कार्यकर्तेही जीवाचे रान करताना दिसत आहेत.
शिंदे यांनी सिंचनाची कामे, पाझर तलाव, साठवण तलाव तसेच पंतप्रधान ग्रामसडक अंतर्गत तालुक्यात मोठ्या प्रमाणात रस्ते निर्माण केले आहेत.
गेल्या पाच वर्षांत निधीतून त्यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली आहेत. सदर प्रचार यंत्रणा ना. शिंदे यांच्या कामाची माहिती, कोपरा सभा, कार्यकर्त्यांच्या बैठका आणि प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेऊन सांगत आहेत. खास तमिळनायडू येथून प्रचार करण्यासाठी खास एलईडी स्क्रीन असणाऱ्या गाड्यांचा ताफा मतदारसंघात दाखल झाल्या आहेत. याद्वारे शिंदे यांनी केलेल्या कामांची माहिती दाखवण्यात येणार आहे.
कर्जत-जामखेड या दोन्ही तालुक्यांमध्ये भाजपने आघाडी घेतली असून, शिंदे यांना अधिकाधिक मतांनी विजयी करण्याचा चंग या कार्यकर्त्यांनी बांधला आहे. प्रचाराच्या रणधुमाळीमुळे दोन्ही तालुक्यांत वातावरण सध्या चांगलेच तापल्याचे दिसत आहे. निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियाला महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं आहे. सध्याच्या निवडणुकीच्या धामधुमीत मतदारराजाला व्हॉट्स ऍप’च्या माध्यमातून साद घातली जात आहे. भाजपाने व्हॉट्स ऍप ग्रुपद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे.
शिंदे यांच्यासाठी मतदारसंघात खास यंत्रणा कार्यरत झाल्या असून, सर्व प्रकारच्या सुविधा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. मतदार याद्यांचे वर्गीकरण करणे, मतदारांना हवे असलेले मतदार क्रमांक, मतदान केंद्र याचा तपशील घरघरात पोहचविणे.
बल्क एसएमएस, व्हाईस एसएमएस पाठविणे, कॉल सेंटर कार्यान्वित करुन वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रभागातील व्यक्तींशी संपर्क साधणे, उमेदवारांनी रोज किती ठिकाणी भेटी द्यायच्या, ते ठरविणे, गर्दीच्या जागा शोधून उमेदवारांना मतदारांपर्यत पोहचविणे, डॉक्युमेंटरी तयार करुन स्थानिक वाहिन्यांद्वारे प्रसारित करणे, अशा प्रकाची कामे केली जात आहेत. या कामासाठी कंपन्या जरी बाहेरच्या असल्या, तरी यापासून स्थानिक बेरोजगारांना मोठ्या प्रमाणार रोजगार मिळत आहे.