Radhakrushna Vikhe Patil offer To Ashok Chavan – २०१४मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेत आला. यानंतर २०१९मध्येही पक्षाने लोकसभा निवडणुकीत जोरदार विजय मिळवला. मात्र, सलग २ टर्म केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपची काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा अद्यापही केवळ घोषणाच ठरली आहे. भाजप केंद्रात सत्तेत आल्यानंतर पक्षात काँग्रेस नेत्यांची घाऊक आयात झाली. काँग्रेसचे एकापाठोपाठ एक मात्तब्बर नेते, कथित पक्षनिष्ठ घराणी भाजपमध्ये प्रवेश करू लागली. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे पाटील हे यातीलच एक नाव. २०१४च्या फडणवीस सरकारच्या काळात काँग्रेसकडून विरोधीपक्ष नेतेपदाची धुरा सांभाळलेल्या विखे पाटलांनी २०१९ विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसचा हात सोडून हाती कमळ घेतले. ते विद्यमान सरकारमध्ये मंत्रिपदाची धुरा सांभाळत आहेत. याच विखे पाटलांनी आज त्यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना भाजप प्रवेशाची खुली ऑफर दिली आहे.
काय म्हणाले विखे पाटील?
चव्हाण यांना ऑफर देताना विखे पाटील यांनी, “अशोक चव्हाण सध्या ज्या पक्षात आहेत. त्या काँग्रेस पक्षाचं भविष्य काय आहे? नाशिक पदवीधर मतदारसंघात व्यक्तिगत अजेंड्यावर निवडणूक जिंकली. तिथे पक्षाचा कुठेही विचार झाला नाही. पक्षाचा विचार करण्यासाठी काँग्रेसमध्ये कुणालाही वेळ नाही. मला वाटतं की अशोक चव्हाण हे एक सक्षम नेते आहेत. त्यांनी मुख्यमंत्री पदावर काम केलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व संपूर्ण जगाने स्वीकारलं आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला सर्वांनाच आवडेल. अशोकराव चव्हाणांनीही याबाबत विचार केला पाहिजे.” असं वक्तव्य केलं.
अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाची यापूर्वीही चर्चा
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा यापूर्वीही अनेकदा रंगल्या आहेत. शिंदे फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक प्रस्तावाला चव्हाणांची अनुपस्थिती, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली भेट, मंत्री अब्दुल सत्तार यांनी अशोक चव्हाण यांची घरी जाऊन घेतलेली भेट अशा अनेक कारणांमुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या. अशोक चव्हाण यांनी मात्र या चर्चांना वेळोवेळी नाकारले आहे.
टिट फॉर टॅट की खरंच ऑफर? | Radhakrushna Vikhe Patil offer To Ashok Chavan
दरम्यान, बुधवारी एका कार्यक्रमात बोलताना अशोक चव्हाण यांनी, फडणवीस यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या परिणय फुके यांना काँग्रेस प्रवेशाची थेट ऑफर दिली होती. चव्हाण यांनी फडणवीसांच्या निकटवर्तीयाला दिलेली काँग्रेस प्रवेशाची ऑफर जिव्हारी लागल्याने विखे पाटलांनी टिट फॉर टॅट म्हणून चव्हाणांना ऑफर दिली की भाजप काँग्रेस मुक्त भारतची घोषणा सफल करण्यासाठी ऍक्टिव्ह झालंय हे वेळच सांगू शकेल.