नगर -कल्याण बायपास जवळील लामखडे पेट्रोल पंपाजवळ एका वाहनचालकाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. रामदास बन्सी पंडित (रा. निंबळक, ता. नगर) असे हत्या झालेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
रामदास पंडित हे केडगाव येथे एका ठिकाणी वाहनचालक म्हणून कामाला आहे. बुधवारी (दि.11) रात्री त्यांनी केडगाव येथून घरी येत असल्याची माहिती घरातील व्यक्तींना मोबाइल कॉल करून दिली होती. मात्र त्यानंतर पंडित घरी आले नाहीत. तसेच त्यांचा मोबाइल बंद होता. त्यानंतर त्यांच्या घरातील व्यक्तींनी त्यांची शोधाशोध सुरू केली. आज सकाळी पंडित यांचा मृतदेह कल्याण बायपास जवळील लामखडे पेट्रोल पंपाजवळ आढळला. पंडित यांच्या गळ्यावर हत्याराने वार करण्यात आले होते. त्यामुळे पंडित यांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस प्रशासनाने वर्तविला आहे. पंडित यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.