पुणे – अमेरिकेत जहाजावर ‘मारिन इंजिनिअर’ म्हणून निवड झालेला पुण्यातील तरुण अमेरिकेहून सिंगापूरच्या दिशेने निघालेल्या जहाजावरून बेपत्ता झाल्याची घटना तक्रार अर्जमुळे समोर आली आहे.
याबाबत तरुणाच्या वडिलांनी वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र विभागाशी संपर्क साधून माझ्या मुलाचा शोध घ्यावा, अशी विनंती तरुणाच्या वडिलांनी पोलिसांकडे केली आहे.
प्रणव गोपाळ कराड ( 22, रा. गणपती माथा मंदिराजवळ, वारजे) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रणवचे वडील खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. ते मूळचे बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील रहिवासी आहेत.
प्रणवची मुंबईच्या अंधेरीतील एका शिप मॅनेजमेंट इंडिया प्रा. लि. कंपनीमध्ये निवड झाली होती. त्यानंतर तो कंपनीमार्फत सहा महिन्यांपासून अमेरिकेत जहाजावर ‘मारिन इंजिनिअर’ म्हणून नोकरीस होता.
अमेरिकेहून सिंगापूरच्या दिशेने जहाज निघाले होते. या जहाजावरून प्रणव पाच एप्रिलला बेपत्ता झाल्याची माहिती कंपनीकडून वडिलांना इ-मेलद्वारे कळविण्यात आली. मात्र, त्यानंतर कंपनीकडून समाधानकारक माहिती दिली जात नसल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे