बगदाद, (इराक) – इराकमधील टिक-टॉक स्टार ओम फहाद हिची काल गोळ्या घालून हत्या करण्यात आली. काल रात्री बगदादच्या पूर्वेकडील जोयोना जिल्ह्यातील तिच्या घराजवळ बाहेरच मोटरसायकलवरून आलेल्या मारेकऱ्यांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या.
त्यावेळी ओम फहाद आपल्या एसयूव्ही कारमधून घरी परतली होती. हल्लेखोरांनी अगदी जवळून तिच्यावर गोळीबार केल्याचे जवळच्या सीसीटिव्हीमध्ये चित्रीत झाले आहे.
ओम फहाद हिचे खरे नाव गौफरान सवादी असे होते. टिक-टॉक ऍपवर ती पॉप गाण्यावर बनवलेले शेकडो व्हिडीओ अपलोड करत असे. तिच्या व्हिडीओंना जवळपास ५ लाख फॉलोअर होते. तिच्या काही व्हिडीओंना तर १० लाखांपेक्षा जास्त प्रेक्षकांनी बघितल्याची नोंद होती.
इराकी न्यायालयाने तिच्या व्हिडीओंमध्ये असलेली अयोग्य भाषा सार्वजनिक नैतिकतेचे अवमूल्यन करणारी असल्याचे ठरवून २०२३ मध्ये ६ महिन्यांची शिक्षा सुनावली होती.
तिच्याशिवाय अन्य ५ तशाच ऑनलाईन कला सादरकर्त्यांना देखील २ वर्षांपर्यंतच्या कालावधीची शिक्षा सुनावली गेली होती. तर इतरांविरोधात तपास सुरू केला गेला होता.
नैतिकता आणि कौटुंबिक संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी ओम फहाद सारख्यांच्या ऑनलाईन व्हिडीओंमध्ये अश्लीलता आणि रुचीहीनता आहे का नाही, हे तपासण्यासाठी इराकच्या गृहमंत्रालयाने जानेवारी २०२३ मध्ये एक कमिटी देखील स्थापन केली होती.
याला लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. मात्र तरिही असे व्हिडीओ करणाऱ्या काही कलाकारांना माफी मागावी लागली होती आणि आपले व्हिडीओ इंटरनेटवरून हटवावे लागले होते.
ओम फहाद किंवा तिच्या सारख्या ऑनलाईन कलाकारांनी आपली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मर्यादा ओलांडली नव्हती, असे जिनिव्हास्थित युरो-मेड ह्युमन राईटस मॉनिटर या संघटनेने म्हटले आहे.