Solapur Lok Sabha Election 2024 – सोलापुरात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्यात थेट लढत आहे. आमदार प्रणिती शिंदेनी (Praniti shinde) सभांच्या माध्यमातून भाजपावर हल्लाबोल कर आहेत. मात्र, सभेदरम्यान त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना पुलवामा हल्ल्याचा दाखला दिला. आता, याच विधानावरुन प्रणिती शिंदे अडचणीत आल्या आहेत. भाजपाने निवडणूक आयोगाकडे प्रणिती शिंदे यांच्या विधानाची तक्रार केली आहे.
पुलवामा हल्ला प्रकरणी प्रणिती शिंदे यांनी केलेले विधान हे देशद्रोही असून, सैन्याचे मनोधैर्य खचवणारे असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार गुन्हा दाखल करावा आणि योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी देखील भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. निवडणूक आयोग आता काय भूमिका घेणार, कारवाई करणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार –
प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात देशद्रोही वक्त्यव्य केले आहे. सोलापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती प्रणिती शिंदे यांनी राजकीय फायद्यासाठी या दुःखद घटनेचा गैरफायदा घेतल्याचे निदर्शनास आले आहे. प्रणिती शिंदे यांनी विधान केले की “पुलवामा हल्ला हे केंद्र शासन व मा. पंतप्रधान मोदीजींनी आपल्या जवानांचे रक्त सांडून ‘घडले’ नसून ‘घडवले आहे. काश्मीरमध्ये पुलवामा भागात पाकिस्तानी अतिरेक्यांनी भीषण हल्ला केला होता. पुलवामाचा हा हल्ला घडला नाही तर घडविण्यात आला होता. प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांनीच त्याचा गौप्यस्फोट केला होता.” है वक्त्यव्य देशाची बदनामी करणारे व ‘देशद्रोही वक्तव्य आहे. जे निवडणूक नियमांची तसेच आपल्या देशाच्या सैन्याचे मनोधैर्य खचवणारी आहे, अशा आशयाचे पत्र भाजपाने निवडणूक आयोगाला दिले आहे.