मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेमुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा जुंपली असल्याचे दिसत आहे. नारायण राणे यांनी यात्रेवेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर राणेंना यांना शिवसैनिक स्मृतिस्थळावर येऊ देणार नसल्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे गुरुवार व शुक्रवार जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. यात्रेदरम्यान गुरुवारी सकाळी राणे हे शिवाजी पार्कातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करणार असल्याचे भाजपने जाहीर केले आहे. यावर शिवसेनेने हरकत घेत जोरदार विरोध केला आहे.
शिवसेनेचे विनायक राऊत यांनी राणे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. राणे यांना बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांच्यासारखा बाडगा आणि बाळासाहेबांशी बेईमानी केली असा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. त्यामुळे अशा नेत्याला स्मृतिस्थळाला भेट शिवसैनिक देऊ देणार नाहीत, असे राऊत म्हणाले.
राऊत यांच्या विधानामुळे शिवाजी पार्कात पुन्हा एकदा भाजप, शिवसेना एकमेकांविरुद्ध भिडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर, भाजपने मात्र शिवसेनेच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. बाळासाहेब हे संपूर्ण देशाचे आहेत. त्यांच्या दर्शनासाठी अटकाव घालणे म्हणजे कोत्या मनोवृत्तीचे प्रदर्शन आहे, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.