बंगळुरू – माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा यांची सेक्स टेप उघड करणारा कथित ड्रायव्हर बेपत्ता झाला आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते देवराजे गौडा यांना आपणच रेवण्णांचे आक्षेपार्ह व्हिडिओ पेन ड्राइव्हमध्ये दिले होते असा दावा या पूर्वाश्रमीच्या कार्तिक नावाच्या वाहनचालकाने केला होता.
विशेष तपास पथकाने त्याची चौकशी करण्यासाठी त्याला नोटीस पाठवली होती. मात्र तो आता बेपत्ता झाला आहे. दरम्यान, प्रज्ज्वल रेवण्णा याचे काका आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी कार्तिकच्या बेपत्ता होण्यामागे कर्नाटकचे कॉंग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांचा हात असल्याचे म्हटले आहे.
उपलब्ध माहितीनुसार कार्तिकने प्रज्ज्वल याच्यासोबत १३ वर्षे काम केले आहे. वर्षभरापूर्वी कथित जमीनीच्या व्यवहारावरून त्याचे प्रज्ज्वलशी भांडण झाले होते. त्यानंतर त्याने ड्रायव्हरची नोकरी सोडली होती. आपल्याला न्याय मिळावा यासाठी तो कथितपणे देवराज गौडा यांच्या संपर्कात होता.
दरम्यान, पत्रकारांशी बोलताना कुमारस्वामी म्हणाले की कार्तिक गायब होण्यामागे एका बड्या नेत्याचा हात आहे. शिवकुमार यांच्याकडे इशारा करताना ते म्हणाले की कार्तिकला मलेशियाला कोणी पाठवले?
तर त्यांच्या आरोपांना उत्तर देताना शिवकुमार म्हणाले की कुमारस्वामी असे म्हणत आहेत याचा अर्थ त्यांना सगळी माहिती अगोदरच होती. कार्तिकला मलेशियाला पाठवायला मी काही वेडा आहे का? मी असे लपून छपून राजकारण करत नाही. त्याची गरज गौडा यांना आहे.