नगर -राज्याचे शिवसेनेचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी प्रकाश गडाख यांचा गळफासामुळे मृत्यु झाला. रविवारी त्यांच्यावर सोनई येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गौरी गडाख यांच्या मृत्युमुळे सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सोनईला येत गडाख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी मंत्री शंकरराव गडाख, प्रशांत गडाख यांना त्यांनी धीर दिला.
गौरी गडाख या माजी खासदार आणि साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावजय, तर यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या पत्नी होत. गौरी गडाख शनिवारी रात्री राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या होत्या. सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालात त्यांनी गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले.