ऐन दिवाळीत झटका; खाद्यतेलालाही महागाईचा ‘तडका’

20 दिवसांत डब्याच्या भावात 500 रुपयांनी भाववाढ

पुणे – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डात खाद्य तेलाची मागणी वाढली आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या भाव तेजीत असून, मागील 20 दिवसांत तेलाच्या डब्याच्या भावात तब्बल 500 रुपयांनी वाढ झाली आहे. तर आठवडाभरात डब्यामागे 100 रुपयांची वाढ झाल्याची माहिती व्यापारी रायकुमार नहार यांनी दिली.

 

दिवाळीला घराघरांत विविध प्रकारचे फराळ केले जातात. यासाठी खाद्य तेलाला मोठी मागणी असते. यात विशेषत: सूर्यफुल, शेंगदाणा, सोयाबीन आणि पाम तेलाला मागणी वाढत असते. यंदा लॉकडाऊनपासून घाऊक बाजारात तेलाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे मागणी अधिक आणि आवक कमी असे चित्र निर्माण झाले. त्याचाच परिणाम म्हणून दिवसेंदिवस खाद्यतेलाचे भाव वाढत आहेत. पण, तरीही विक्रेते आणि ग्राहकांकडून खाद्यतेलाला मागणी कायम आहे.

 

सातत्याने मागणी वाढत असल्याने दिवाळी सणापर्यंत खाद्यतेलाचे भाव तेजीत राहणार आहेत. याविषयी नहार म्हणाले, “दरवर्षी दिवाळी सणाला 20 हजार टन तेलाची आवश्यकता असते. मात्र, यंदा सर्वत्र खाद्यतेलाचा तुटवडा जाणवत आहे. डॉकमध्ये केवळ 15 हजार टन खाद्यतेल आहे. मागणीच्या तुलनेत साठवणूक कमी असल्याने भाव वाढले आहेत. तसेच आणखी काही काळ भाव अधिकच असणार आहेत. इंडोनेशिया आणि मलेशियातून पाम तेलाची आवक होत आहे. बाजारात सोयाबीनचे भाव वाढले आहेत. त्यामुळे तेलाचेही भाव वाढले आहेत. एकीकडे तुटवडा, तर दुसरीकडे अधिकची मागणी त्यामुळेच खाद्यतेलाच्या भावात मोठी वाढ झाली आहे.’

 

घाऊक बाजारातील खाद्यतेलाचे भाव (रुपयांत)

तेल भाव (15 किलो व लिटर)

शेंगदाणा- 2,130-2,270

सूर्यफुल -1,700-1,830

सोयाबीन- 1,630-1,730

पाम -1,550-1,750

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.