मास्क, सॅनिटायजर झाले कमाईचे साधन

“एन-95′ मास्कचा तुटवडा; : मास्क ओळखण्यात होत आहे गल्लत

पिंपरी – शहरात करोनाच्या पार्श्‍वभूमीवर मास्कची मागणी वाढल्याने नागरिकांच्या भीतीचे भांडवल करत काही औषध विक्रेत्यांनी किंमती दुपटीने वाढविल्या आहेत. एन-95 मास्कचा तुटवडा जाणवत आहे. बाजारपेठेत त्यांची चढ्या दराने विक्री केली जात आहे. सॅनिटायजर, हॅण्डवॉशच्या दरातही वाढ झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. याबाबत दैनिक “प्रभात’ने वेगवेगळ्या मेडिकलमध्ये जाऊन पाहणी केली असता परिस्थितीचा काही व्यावसायिक फायदा घेत असल्याचे दिसून आले. प्रचलित सॅनिटायजर आणि हॅंडवॉशचा तुटवडा जाणवत असल्याने बाजारात सध्या कधीही न पाहिलेले आणि कधीही नाव न ऐकलेले ब्रॅंडसुद्धा विकले जात आहेत. मास्कच्या खरेदी-विक्रीत काळाबाजार सुरू असल्याचे देखील काही विक्रेत्यांनी दैनिक “प्रभात’ला सांगितले.

पुण्यापाठोपाठ पिंपरीतही करोनाचे रूग्ण सापडल्याने आता मास्क आणि हात धुण्यासाठी सॅनेटाइझरची मागणी वाढली आहे. औषध विक्रेत्यांकडे वेगवेगळ्या प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कॉटन मास्क, ट्रिपल लेअर (फिल्टर मास्क), टिश्‍यू मास्क, आणि एन-95 मास्क आदींचा समावेश आहे. एन-95 मास्कचा सध्या विशेष तुटवडा जाणवत आहे. संबंधित मास्क हे डॉक्‍टरांचे प्रिस्क्रिप्शन घेऊनच दिले जात आहे. 250 ते 450 रुपयांपर्यंत हे मास्क उपलब्ध आहेत. या मास्कच्या खरेदी-विक्रीत काळाबाजार सुरू असल्याचे काही विक्रेत्यांनी खासगीत सांगितले. कंपन्यांनुसार त्याच्या किंमती या वेगवेगळ्या आहेत. एन-95 मास्क नेमका ओळखायचा कसा, याबाबतही नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडत आहे. “एन-95′ लिहिलेला मास्क 225 ते 250 रुपयांपर्यंतही मिळत आहे. तर, काही विक्रेत्यांकडे हाच मास्क 450 रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे यातला खरा मास्क कोणता आणि खोटा कोणता, याविषयी चांगलीच गल्लत होत आहे.

कॉटन मास्क हे पूर्वी 30 ते 35 रुपयांपर्यंत मिळत होते. सध्या त्याची किंमत 35 ते 40 रुपये इतकी झाली आहे. ट्रिपल लेअर मास्क देखील 35 ते 40 रूपयांपर्यंत विकले जात आहेत. तर, एन-95 मास्क हे पूर्वी 180 ते 190 रुपयांपर्यंत मिळत होते. आता त्याची किंमत 225 ते 450 रुपयांपर्यंत आहे.

बाजारपेठेत उत्पादकांकडूनच जादा किंमतीने मास्कचा पुरवठा होत आहे. पुरवठादार विक्रेत्यांनी त्यांचा नफा वाढविलेला नाही. उत्पादकांकडूनच मास्कचा पुरवठा करताना ठरविण्यात येणाऱ्या किंमतीवर नियंत्रण आणायला हवे.
– संतोष खिंवसरा, अध्यक्ष, पिं.चिं. केमिस्ट असोसिएशन


बाजारपेठेत कॉटन, ट्रिपल लेअर, एन-95, टिश्‍यू मास्क असे वेगवेगळे मास्क उपलब्ध आहेत. पूर्वीपेक्षा त्यांच्या किंमती वाढलेल्या आहेत. सॅनेटाइझरची विक्री ही एमआरपी किंमतीनुसारच केली जात आहे. त्यातील विक्रेत्यांना मिळणारा नफा मात्र कमी झाला आहे.
– सचिन लोढा, औषध विक्रेते

सॅनिटायजरच्या किंमतीतही वाढ
उत्पादकांनी सॅनिटायजरच्या किंमती वाढविल्याने आपोआपाच त्यांचे बाजारपेठेतील दरही वाढले आहेत. 50 एमएलचे सॅनिटायजर 40 ते 50 रुपयांत उपलब्ध आहे. 100 एमएलचे सॅनिटायजर 150 रुपयांमध्ये तर, 250 एमएलचे सॅनेटाइजर हे 250 रुपयांपर्यंत मिळत आहे. सॅनेटाइजरच्या किंमती वाढल्या असल्या तरीही त्याला सध्या चांगलीच मागणी आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.