Lok Sabha Election 2024: काँग्रेसच्या वतीने वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वर्षा गायकवाड यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवणार असल्याचे म्हटले.
इतकेच नाही तर आपण पहिल्यांदा पंजा या चिन्हाला मतदान करणार असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर त्याच हातात मशाल असल्याचे सांगत, त्याच हाताने पुढे तुतारी वाजवणार असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
देशामध्ये हुकूमशाही येता कामा नये, घटनेचे रक्षण झाले पाहिजे, घटना बदलता कामा नये, यासाठी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये इंडिया आघाडी एक मताने लढत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
वर्षा गायकवाड या पूर्ण मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे त्या मुंबईतून कोणत्याही मतदार संघातून निवडणूक लढवू शकतात. मी देखील आता त्यांचा मतदार आहे. त्यामुळे आपण त्यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवणारच असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, त्यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही.