नाशिक – नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराज यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज पहिलाच दिवस होता. वास्तविक शांतिगिरी महाराज यांनी महायुतीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. मात्र, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. एकीकडे महाविकास आघाडीच्या वतीने प्रचारांला सुरुवात देखील झाली आहे. तर दुसरीकडे अद्याप महायुतीचा उमेदवारच निश्चित झालेला नाही. त्यामुळे आता नाशिक लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Shantigiri Maharaj filed his nomination form from Nashik Lok Sabha Constituency)
नाशिक लोकसभा मतदारसंघातून सुरुवातीपासूनच शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. या साठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. महायुतीच्या वतीने आपण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून आपल्याला उमेदवारी देण्यात आली तर आपला विजय निश्चित असल्याचा दावा शांतिगिरी महाराज यांनी केला आहे. इतकेच नाही तर त्यासाठी शांतिगिरी महाराजांनी त्र्यंबकेश्वर येथे राहत अनुष्ठान देखील पूर्ण केले आहे. त्यामुळे या मतदारसंघातून शांतिगिरी महाराजांच्या नावाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत. मात्र, हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावा, अशी मागणी महायुतीमध्ये करण्यात आली होती. त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडूनच छगन भुजबळ यांचे नाव सुचवण्यात आले होते. मात्र महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. कोणालाही उमेदवारी त्या मात्र, लवकर जाहीर करा, असे म्हणत छगन भुजबळ यांनी महायुतीला घरचा आहेर दिला होता. मात्र, तरी देखील अद्याप नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही.
गोडसेंच्या प्रचाराला सुरुवात
नाशिक लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप त्यांच्या नावाची घोषणा झाली नाही. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटणार होता. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी देखील या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण? असा प्रश्न उपस्थित होतोय.