सिंधुदुर्ग – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना काळात खासदारांचा आठ हजार कोटी निधी थांबवला आणि स्वत:साठी साडेसात हजार कोटींचे आलिशान विमान खरेदी केले, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला. सिंधुदुर्गमध्ये प्रचारप्रमुख म्हणून आलेल्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातल्या लोकांच्या पोटावर पाय आणल्याची टीकाही त्यांनी केली.
आगामी लोकसभा 2024 च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येक पक्षाकडून सभांचे आयोजन केले जात आहे. प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघात कंबर कसली आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. सिंधुदुर्गमध्ये ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना काळात खासदारांचा 8000 कोटी रुपयांचा निधी थांबवून स्वत:साठी 7500 कोटींचे आलिशान विमान घेतले. दुसरीकडे सिंधुदुर्ग येथे प्रचारप्रमुख गोव्यातून आणावे लागतात, अशी वेळ भाजपावर आली असल्याची टीका करत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांवर अन्याय केला. सिंधुदुर्गातील लोकांच्या पोटावर पाय आणण्याचे काम प्रमोद सावंत यांनी केल्याची टीकादेखील विनायक राऊत यांनी केली.